दीड हजार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

पणजी : २२ हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याच्या दाव्यात तथ्य नाही. जेमतेम ३५०० च्या आसपास सरकारी नोकरीच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी १५०० पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित २ हजार पदांसाठी टप्प्याटप्प्याने जाहिराती जारी केल्या जाणार आहेत, अशी माहिती कार्मिक विभाग तसेच कर्मचारी भरती आयोगाच्या सूत्रांकडून मिळाली.
सरकारी खात्यांमधील गट ‘क’ पदांची भरती करण्यासाठी कर्मचारी भरती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. सरकारी शाळा, महाविद्यालये आणि इतर विभागांतील शिक्षक, एलडीसी, यूडीसी, स्टेनोग्राफर, पंचायत सचिव, तलाठी, पोलीस शिपाई, पोलीस उपनिरीक्षक, कनिष्ठ अभियंते, मीटर रीडर, लाईन हेल्पर आणि लॅबोरेटरी असिस्टंट या पदांची भरती आयोगामार्फत केली जाते.
यंदा विविध सरकारी खात्यांनी रिक्त असलेल्या ३५०० पदांची माहिती आयोगाकडे सादर केली आहे. काही पदांबाबत आयोगाने संबंधित विभागांकडून स्पष्टीकरण मागवले असून ते आल्यानंतर अंतिम पदसंख्या निश्चित केली जाणार आहे.
मात्र, आतापर्यंत १५०० पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जाहिरातीनंतर सीबीटी परीक्षा घेण्यात आली असून काही पदांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित २ हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया पुढे सुरू होणार आहे.
वाहतूक संचालनालय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, नागरी पुरवठा खाते, पुराभिलेख खाते, कॅप्टन ऑफ पोर्ट, खाण संचालनालय, वीज खाते, पंचायत संचालनालय, कला व संस्कृती संचालनालय, सार्वजनिक बांधकाम खाते, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, जलवाहतूक खाते, कौशल्य विकास संचालनालय, व्यावसायिक कर विभाग, माहिती व प्रसिद्धी खाते, कृषी संचालनालय, पर्यटन संचालनालय आणि तांत्रिक शिक्षण संचालनालय.