आरजीपीमध्ये संभ्रम : आमदार बोरकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

पणजी : मनोज परब यांनी ‘आरजीपी’च्या अध्यक्ष आणि संस्थापक सदस्यपदाचा राजीनामा देऊन २४ तास उलटले तरी, आमदार वीरेश बोरकर यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बोरकर सध्या पक्षाच्या संपर्कात नसल्याने ते पक्षातच राहणार की मनोज परब यांच्या पावलावर पाऊल ठेवत वेगळी वाट स्वीकारणार, याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पक्षातील अंतर्गत राजकारण सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याचे सांगत आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी पदांचा राजीनामा देत सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. कठीण काळात त्यांनी पक्ष सोडू नये, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत लोकांकडून त्यांना मोठी सहानुभूती मिळत आहे.
मात्र, या सर्व घडामोडींवर आमदार वीरेश बोरकर यांनी अद्याप मौन बाळगले असून त्यांच्या शांततेबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
परब यांच्या राजीनाम्यानंतर वीरेश बोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा फोन बंद असल्याचे समोर आले असून त्यांच्या सहकाऱ्यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. बोरकर यांनी कार्यकारिणी समितीशी पूर्णपणे संपर्क तोडला असून ई-मेल आणि व्हॉट्सअॅप संदेशांनाही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
मनोज परब यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील प्रत्यक्ष राजकारण काहीसे शांत झाले असले तरी सोशल मीडियावर समर्थकांनी वादाला हवा दिली आहे. यात बोरकर यांचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, आमदार झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीतील विधानांचा नव्याने अर्थ लावला जात आहे.
पक्षात धर्म आणि जातीचे राजकारण झाल्याबाबत मुख्यमंत्री यांनी केलेले विधान चुकीचे नाही, असा दावा पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. काही सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट केल्यावर कारवाई करण्यात आली होती आणि त्यांना बोरकर यांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या वादामुळे वीरेश बोरकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत असून ते उपचारासाठी बंगळुरूला गेल्याची माहिती समोर आली आहे. चर्चेसाठी अनेकदा विनंती करूनही ते बोलण्यास तयार नसल्याचा दावा समर्थकांनी केला आहे.