ऋषभच्या अभिनयावर प्रकाश टाकण्याचा हेतू : रणवीर सिंग

पणजी : गोव्यात (Goa) नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) (56th Indian International Film Festival) (IFFI) समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Actor Ranveer Singh) यांनी ‘कांतारा – चॅप्टर १’ या कन्नड चित्रपटातील देवीच्या अवताराची रंगमंचावर नक्कल केली.
आणि चित्रपटात दाखवलेल्या पवित्र दैवत कोटीतुलू समाजातील चामुंडी देवी हिला ‘फिमेल घोस्ट’ (भूत) असे संबोधले आहे. या प्रकरणी अभिनेता रणवीर सिंग यांच्यावर चामुंडी देवी यांचा अपमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारे तक्रार वजा निवेदन हिंदु जनजागृती समितीने पणजी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले आहे.
पणजी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साहिन शेट्ये यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीचे प्रमोद तुयेकर आणि दिलीप शेट्ये यांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, चामुंडी दैव ही तुलू समाजाच्या आराध्य आणि कुलदैवत आहेत. देवीला ‘भूत’ म्हणणे आणि तिच्या दैवी अवताराची करमणुकीच्या हेतूने नक्कल करणे ही अत्यंत अवमानकारक आणि हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानावर आघात करणारी कृती आहे.
या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी रणवीर सिंग यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत धार्मिक भावना जाणूनबुजून दुखावणे व समाजात वैरभाव पसरविणे या गुन्ह्यांशी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी.
‘इफ्फी’चे आयोजक आणि संबंधित अधिकारी यांनीही भविष्यात अशा कार्यक्रमांत कोणत्याही धर्माच्या देव–देवतांचा अवमान होऊ नये, यासाठी स्पष्ट आचारसंहिता तयार करावी आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
हिंदु जनजागृती समितीने रणवीर सिंग यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी आणि पुढे अशा प्रकारचे वक्तव्य अथवा अभिनय न करण्याची हमी द्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व हिंदू बांधवांना कायद्याचा मार्ग अवलंबून शांततामय, संयमी पण ठामपणे या अवमानाचा निषेध नोंदवण्याचे आवाहनही समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
ऋषभच्या अभिनयावर प्रकाश टाकण्याचा हेतू : रणवीर सिंग
चित्रपटातील ऋषभच्या अविश्वसनीय अभिनयावर प्रकाश टाकण्याचा माझा हेतू होता. अभिनेता ते अभिनेता. तो विशिष्ट देखावा त्याने ज्या पद्धतीने सादर केला त्या पद्धतीने करण्यासाठी किती वेळ लागेल हे मला माहिती आहे. ज्यासाठी मी त्याचे खूप कौतुक करतो. मी नेहमीच आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा मनापासून आदर करतो, असे अभिनेता रणवीर सिंग यांनी यावर ट्विट करताना म्हटले आहे.