ड्रग्जप्रकरणी डुडूविरुद्ध आरोपपत्र सादर

कोकेन बाळगल्याप्रकरणी ‘एनसीबी’कडून कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December, 11:29 pm
ड्रग्जप्रकरणी डुडूविरुद्ध आरोपपत्र सादर

म्हापसा : कोकेन बाळगल्याप्रकरणी इस्रायली नागरिक डेव्हिड ड्रिहम ऊर्फ डुडू याच्याविरूध्द म्हापसा न्यायालयात केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने आरोपपत्र सादर केले आहे.
सोमवारी एनसीबीने याप्रकरणी म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयात डुडू विरोधात आरोपपत्र सादर केले आहे. ३ जून २०२५ रोजी हणजूणमध्ये एनसीबीने डुडूकडून ११ ग्रॅम कोकेन जप्त करीत त्याला अटक केली होती. ड्रग्ज तस्करीमध्ये डुडू हा सक्रिय असल्याची माहिती गुप्तहेरांकडून एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीचे उपसंचालक नितीन गवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक फ्रान्सिको झेवियर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हणजूण येथे छापा टाकून डुडूला कोकेनसह रंगेहाथ पकडले होते. झडतीवेळी त्याच्याजवळ ११ ग्रॅम कोकेन सापडले होते. सध्या संशयित आरोपी डुडू हा याप्रकरणात जामीनावर आहे.
डुडूच्या अटकेनंतर राज्यात खळबळ माजली होती. यात पोलीस अधिकाऱ्यांसह मंत्र्यांच्या नातेवाईकांवरही आरोप झाले होते. या प्रकरणी न्यायालयाने डुडूला निर्दोष मुक्त केले होते. तर या प्रकरणातील एएनसीच्या पथकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने निर्देश दिले होते. तसेच २०१९ मध्ये हणजूण समुद्रकिनारी एका जेस्की कामगारावर सुरीहल्ला केल्याप्रकरणात डुडूची पुराव्याअभावी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती.
२०१० मध्ये झाली होती अटक
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) २१ फेब्रुवारी २०१० रोजी हणजूण येथील सेंट अॅन्थनी चॅपेलजवळ छापा टाकून डुडूला अटक केली होती. त्यावेळी त्यामयाकडून २ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचे ४.४ ग्रॅम हिरॉईन, ५.३४ ग्रॅम कोकेन, ४.३१ ग्रॅम लिक्विड एलएसडी, १.१६ किलो चरस असा ड्रग्ज जप्त केला होता. या प्रकरणी एएनसीने अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून डुडूला अटक केली होती.    

हेही वाचा