गोव्यात भूजल वापरात वाढ; मात्र राज्यातील सर्व तालुके सुरक्षित श्रेणीत

घरगुती वापरासह शेतीसाठी पाण्याचा उपसा वाढला

Story: पिनाक कल्लोळी। गोवन वार्ता |
01st December, 10:51 pm
गोव्यात भूजल वापरात वाढ; मात्र राज्यातील सर्व तालुके सुरक्षित श्रेणीत

पणजी : गोव्यात मागील एका वर्षात भूजल वापरात ०.३९ टक्क्यांनी वाढ झाली. घरगुती आणि कृषी क्षेत्रासाठी पाण्याचा वापर वाढल्याचे दिसून आले. असे असले तरी राज्यातील सर्व तालुक्यांमधील भूजल साठा ‘सुरक्षित’ श्रेणीत असल्याचे केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालातून समोर आले.

वापरात वाढ पण साठा सुरक्षित
२०२४ मध्ये राज्यातील उपलब्ध भूजल साठ्यापैकी २२.९१ टक्के पाण्याचा वापर झाला होता. २०२५ मध्ये हे प्रमाण वाढून २३.३ टक्के इतके झाले. केंद्रीय मंडळाच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये जमिनीत ३८ कोटी घनमीटर पाणी मुरले. त्यातील ३१ कोटी घनमीटर पाणी वापरण्यायोग्य होते आणि त्यापैकी ७ कोटी घनमीटर पाणी वापरले गेले.

घरगुती वापरासाठी सर्वाधिक उपसा
२०२५ मध्ये जमिनीत ३८ कोटी घनमीटर पाणी मुरले, ज्यातील ३० कोटी घनमीटर वापरण्यायोग्य होते. यातील ७ कोटी घनमीटर पाणी प्रत्यक्ष वापरले. यात घरगुती वापरासाठी सर्वाधिक ४ कोटी घनमीटर, तर शेतीसाठी ३ कोटी घनमीटर पाण्याचा उपसा झाला. ८९ टक्के भूजल साठा हा मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या पावसामुळे भरून निघाला.

देशाची स्थिती
संपूर्ण देशाचा विचार करता २०२५ मध्ये जमिनीत सुमारे ४४,८५२ कोटी घनमीटर पाणी मुरले. यातील ५४ टक्के पाणी मान्सून काळात मुरले होते. यावर्षी देशातील उपयुक्त पाणी साठ्यापैकी ६०.६३ टक्के पाणी वापरले गेले.

भूजल पातळीत चढ-उतार
गोव्यासह देशातील ११ राज्यांत भूजलसाठा ०.१ ते ०.२ मीटरपर्यंत वाढला. अहवालानुसार, २०२५ मध्ये राज्याच्या भूजल पातळीत वाढ झाली असली तरी २०१४ ते २०२४ या दशकाच्या तुलनेत २०२५ मध्ये मान्सूनपूर्व काळातील पातळीत ० ते २ मीटरने घट झाली. मात्र, याच कालावधीत मान्सूननंतरच्या काळात पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले.

#Goa #Groundwater #WaterConservation #CentralGroundWaterBoard #Environment #GoaNews