अल्फ्रान प्लाझातील क्लिनिक परवान्यासाठी डॉक्टराची न्यायालयात धाव

महानगरपालिकेकडून आठ दिवसांत परवाना देण्याची हमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December, 10:49 pm

पणजी : पणजीतील अल्फ्रान प्लाझा इमारतीत क्लिनिक सुरू करू इच्छिणाऱ्या एका होमिओपथी डॉक्टरांचा परवाना महापालिकेने एका जुन्या थकबाकीवरून अडवून धरला होता. याविरोधात डॉक्टरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सुनावणीदरम्यान महानगरपालिकेने आठ दिवसांत परवाना देण्याची हमी दिल्याने डॉक्टरांनी आपली याचिका मागे घेतली.

स्वतःची जागा असूनही अडवणूक
होमिओपथी डॉक्टर जुजे फिलिप क्लेमेंट डायस यांनी अल्फ्रान प्लाझा इमारतीतील स्वतःच्या मालकीच्या जागेत क्लिनिक सुरू करण्यासाठी महापालिकेकडे व्यावसायिक परवाना मागितला. जागा स्वतःची असल्याने परवाना सहज मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, या जागेशी निगडित ३५ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे कारण पुढे करत महानगरपालिकेने परवाना देण्यास नकार दिला. जागा सध्या रिकामी असून आपल्या नावावर कोणतीही थकबाकी नसताना परवाना अडवल्याने जुजे डायस यांनी न्यायालयात धाव घेतली.

भाडेकरूचा जुना परवाना
२०१५ मध्ये जुजे डायस यांनी ही जागा एका व्यक्तीला भाड्याने दिली होती. त्या भाडेकरूने व्यावसायिक परवाना घेऊन व्यवसाय सुरू केला होता. २०१६ मध्ये त्या व्यक्तीचा परवाना कालबाह्य झाला आणि जागा रिकामी झाली. २०१६ ते २०२५ या काळात ती जागा बंदच होती. आता जुजे डायस यांनी नवीन परवान्यासाठी अर्ज केला असता, महानगरपालिकेने जुन्या परवान्याची (क्रमांक ७३२०) ३५ हजार रुपये थकबाकी असल्याचे सांगितले. या जुन्या परवान्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे जुजे डायस यांनी स्पष्ट केले.

पालिका घेणार आठ दिवसांत निर्णय
उच्च न्यायालयात सुनावणीवेळी, डॉक्टरांनी नवीन परवाना अर्ज केल्यास त्यावर आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी हमी महानगरपालिकेने दिली. यानंतर जुजे डायस यांनी याचिका मागे घेतली. महापालिकेच्या अशा कारभारामुळे परवाना मिळवण्यासाठी थेट उच्च न्यायालयात जावे लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

#Goa #Panaji #HighCourt #CCP #CivicIssues #AlfranPlaza #MedicalLicense