डॉ. प्रमोद सावंत : साखळीत राज्यस्तरीय कला सृजनोत्सव २०२५चे उद्घाटन

साखळीत आयोजित सृजनोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत संचालक विवेक नाईक व इतर.
साखळी : सरकारी कर्मचारी हे वास्तविक जनतेचे सेवक असतात. त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या लोकांशी सोज्वळ व नम्रतेने वागावे. आपण जनतेचे सेवक म्हणूनच सर्वांशी संवाद साधत काम करावे. आपण जरी मुख्यमंत्री असलो तरी सर्वप्रथम जनतेचा ‘मुख्यसेवक’ आहे, हे ध्यानात ठेवून लोकांची कामे करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी रवींद्र भवन येथे शासकीय कर्मचारी सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘कला सृजनोत्सव २०२५’ च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक, शासकीय कर्मचारी सांस्कृतिक मंचच्या अध्यक्षा बिंदीया वस्त, निवृत्त सदस्य सचिव स्वाती दळवी व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांप्रति आपले कर्तव्य कसे पार पाडावे, यावर मार्गदर्शन केले. जर सरकारी कार्यालयात येणाऱ्या लोकांना ‘काय काम आहे रे?’ अशा उर्मट भाषेत विचारले, तर तुमची बदनामी होईल. परंतु, जर नम्र भाषेत ‘कशासाठी आला होता, काय काम होत आपलं?’ अशी विचारपूस केली, तर लोक तुम्हाला ‘बाय, ताई, भाई, भाऊ’ अशा आदराने हाक मारतील.
सरकारी कर्मचारी या नात्याने आम्ही लोकांची कामे नम्रपणे आणि वेळेत करायची आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी लोकांची कामे प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस चालणाऱ्या या कला सृजनोत्सव कार्यक्रमात गोवाभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विविध कला व सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा होणार आहेत.
कला महोत्सवाचा उद्देश
दोन दिवस चालणाऱ्या या ‘कला सृजनोत्सव’ कार्यक्रमात सुमारे १२०० सरकारी कर्मचारी सहभागी होत आहेत. काम करत असताना विरंगुळा व करमणूक आवश्यक आहे, ज्यामुळे ताण तणावातून दिलासा मिळतो. हा महोत्सव कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देतो. अशा कार्यक्रमांमुळे सर्व कार्यालयांमधील कर्मचारी एकत्रित येतात. यामुळे त्यांच्यातील दुरावा कमी होऊन समन्वय वाढतो आणि त्याचा फायदा लोकांची कामे अधिक वेगवानपणे व पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.