गोवा क्रिकेट असोसिएशनकडून सत्तरीतील शाळांची हेळसांड

एका वर्षापासून साहित्याची प्रतीक्षा : गेल्यावर्षीचे खेळणी साहित्य न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा क्रिकेट असोसिएशनकडून सत्तरीतील शाळांची हेळसांड

वाळपई : गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे (जीसीए) गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या सत्तरी तालुक्यातील शाळांवर जीसीएने अन्याय केल्याची भावना तीव्र झाली आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या शाळांना खेळण्याचे साहित्य देण्याचे आश्वासन असोसिएशनने दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही गोव्याच्या इतर तालुक्यांमधील शाळांना साहित्य वाटप होऊनही सत्तरीतील एकाही शाळेला साहित्य मिळाले नसल्यामुळे येथील शाळांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.
जीसीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
शालेय पातळीवर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जीसीएने स्पर्धा आयोजित केली होती. सत्तरी तालुक्यातील जवळपास ८० टक्के शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेऊन चांगली कामगिरी केली होती. मात्र, आता साहित्य वाटपात सत्तरीला वगळल्यामुळे अनेक शाळांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
खेळाचे साहित्य मिळवण्याकरिता सत्तरीतील अनेक शाळांनी जीसीएच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अनेकांनी आपल्या अधिकृत मेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अजूनपर्यंत कोणताही अनुकूल प्रतिसाद मिळालेला नाही. जीसीएच्या या दुर्लक्षात्मक भूमिकेमुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी हे प्रोत्साहन देण्याऐवजी निरुत्साह करणारे ठरले आहे.
दरम्यान, लवकरच पुन्हा अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. परंतु, गेल्या वर्षीचे साहित्य अजूनपर्यंत न मिळाल्यामुळे येणाऱ्या स्पर्धेमध्ये सत्तरी तालुक्यातील एकही शाळा सहभागी होणार नसल्याचा स्पष्ट इशारा अनेक शाळांनी दिलेला आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी त्वरित वितरित करावे, अशी मागणी शाळांनी केली आहे, अन्यथा स्पर्धेत भाग घेण्याबाबत फेरविचार करावा लागेल.
मुख्यमंत्री, क्रीडामंत्र्यांकडे तक्रार करणार
मिळालेल्या माहितीनुसार, जीसीएच्या या मनमानी कारभारासंदर्भात सत्तरी तालुक्यातील अनेक शाळा लवकरच गोव्याचे क्रीडा मंत्री यांच्याशी संपर्क साधून या संदर्भातील कैफियत त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचप्रमाणे, सत्तरी तालुक्यातील अनेक शाळा गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन ही गंभीर समस्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे समजते.
आगामी स्पर्धांवर बहिष्काराचा इशारा
सत्तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट क्रीडा कौशल्ये आहेत, हे अनेक स्पर्धांमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीवरून सिद्ध झाले आहे. त्यांना प्रोत्साहन देणे ही जीसीएची जबाबदारी आहे, परंतु आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे या साहित्यवाटपातील त्रुटीतून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा