गोव्यातील ४०% पाणी गळती-चोरीमुळे वाया; यात ५०% कपात करण्याचा प्रयत्न : मंत्री फळदेसाई

म्हणाले- उपलब्ध असलेले ७०० एमएलडी पाणी पूर्ण वर्षभर वापरात आणण्यावर असेल भर.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
39 mins ago
गोव्यातील ४०% पाणी गळती-चोरीमुळे वाया; यात ५०% कपात करण्याचा प्रयत्न : मंत्री फळदेसाई

मडगाव: गोवा राज्यात जलवाहिन्यांतील गळती आणि पाण्याची चोरी या दोन प्रमुख कारणांमुळे सुमारे ४० टक्के पिण्याचे पाणी वाया जात आहे. पाण्याची ही गळती आणि चोरीचे प्रमाण किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती पेयजल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

४० वर्षे जुन्या जलवाहिन्या

पिण्याच्या पाण्यासंदर्भात बोलताना मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, राज्यातील जलवाहिन्या ४० ते ५० वर्षे जुन्या झाल्या आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. या जलवाहिन्या बदलण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. राज्यासाठी उपलब्ध असलेले ७०० एमएलडी पाणी पूर्णपणे वापरात आणण्यासाठी वर्षभरात प्रयत्न केले जातील. पाणी चोरी आणि गळतीचे प्रमाण कमी करून वाया जाणाऱ्या पाण्यात किमान ५० टक्के कपात करण्याचे प्राथमिक लक्ष्य आहे. गोव्याला भविष्यात फायदा होण्यासाठी २०० एमएलडी क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

राज्यात डिजिटल स्मार्ट मीटर बसवण्याचाही विचार आहे, परंतु त्याआधी पाण्याची विक्री आणि महसूल किती परत मिळेल, तसेच ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. क्रिया केलेले पाणी सरकारला २५ रुपयांनी पडते, तर तेच पाणी ग्राहकांना केवळ ४ रुपयांनी दिले जाते. यामुळे सरकारला आधीच मोठा तोटा सहन करावा लागत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

खाण खंदकातील पाण्याचा वापर

राज्यातील खाण खंदकातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येईल का, या दिशेनेही सरकार प्रयत्नशील आहे.

खंदकातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. प्राथमिक तपासणीमध्ये या पाण्यात हानिकारक द्रव्यांचे प्रमाण खूप कमी असून, याला क्लोरिनेशनचीही आवश्यकता नसेल, असे परिणाम दिसून आले आहेत. विशेष म्हणजे, या खाण खंदकातील पाण्याचे निरीक्षण केले असता अहवाला अंती ते साळावली धरणातील पाण्यापेक्षाही चांगले असल्याचे आले आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत यासंबंधी चांगले निष्कर्ष मिळतील. या माध्यमातून आगामी काळात राज्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या येणार नाही, असा विश्वास मंत्री फळदेसाई यांनी व्यक्त केला.

हेही वाचा