कोलवातील स्वदेश दर्शन २.० प्रकल्प नेमका काय? : स्थानिक मच्छीमारांचा प्रश्न

ग्रामसभेत होणार चर्चा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 mins ago
कोलवातील स्वदेश दर्शन २.० प्रकल्प नेमका काय? : स्थानिक मच्छीमारांचा प्रश्न

पणजी : गोवा ( Goa) पर्यटन विभागातर्फे आंतरराष्ट्रीय (International) पर्यटन स्थळ असलेल्या कोलवा ( Colva Beach) समुद्रकिनाऱ्यावर स्वदेश दर्शन (Tourism Department’s Swadesh Darshan 2.0 ) प्रकल्प साकारण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, हा प्रकल्प नेमका काय त्याची सविस्तर माहिती देण्याची मागणी स्थानिक मच्छीमार व इतरांनी केली आहे. 

प्रकल्प नेमका काय आहे व त्याचे मासेमारी क्षेत्रांवर, उपजिविकेवर काही परिणाम होणार का? सुशोभीकरणाची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

या प्रकल्पासंदर्भात स्थानिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पर्यटन विभागाचा स्वदेश दर्शन २.० हा प्रतिष्ठित कोलवा समुद्रकिनाऱ्यावरील प्रकल्प काय आहे? ही योजना केवळ रोषणाई आणि अतिरिक्त सुविधांसह प्रतिष्ठित समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण करण्याबद्दल आहे की केवळ विद्यमान शॉपिंग सेंटरचा विकास करण्याबद्दल आहे?

स्थानिक मच्छीमार याठिकाणी सध्या मासे सुकवणे, मीठ, मासे साठवणे इत्यादी कामांसाठी पर्यटन विभागाची ही जागा वापरत आहेत, त्याचे काय?  स्वदेश दर्शन २.० साठी मच्छीमारांना तेथून हटवले जाणार का? असे प्रश्न मच्छीमार व स्थानिकांनी उपस्थित केले आहेत. 

गोवा पर्यटन विकास महामंडळाने (GTDC) बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस, सरपंच ट्रेझा, माजी सरपंच सुझी फर्नांडिस आणि इतरांसह विकास आराखडा अंतिम करण्यापूर्वी समुद्रकिनाऱ्याच्या परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर कोलवातील स्थानिकांनी वरील प्रश्न उपस्थित केले आहेत. 

बाणावलीचे आमदार व्हिएगस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीटीडीसीने स्वदेश दर्शन २.० चा मसुदा एक किंवा दोन दिवसांत कोलवा ग्रामपंचायतीला पाठवणे अपेक्षित आहे.

कोलवा पंचायतीत आराखडा प्रदर्श‌ित झाल्यानंतर पंचायत आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे आमदार व्ह‌िएगस यांनी स्पष्ट केले. 


हेही वाचा