कायमस्वरुपी मिनरल फंडा'च्या वापराला परवानगी द्यावी! : मुख्यमंत्री डॉ. सावंत

खाणप्रभावित भागातील लोकांना दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

Story: प्रतिनिधी । मडगाव |
29 mins ago
कायमस्वरुपी मिनरल फंडा'च्या वापराला परवानगी द्यावी! : मुख्यमंत्री डॉ. सावंत

मडगाव: खाणप्रभावित भागातील जनतेच्या विकासासाठी आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी ठेवण्यात आलेला कायमस्वरूपी मिनरल फंड (Permanent Mineral Fund) वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षिण गोवा जिल्हा मिनरल फाउंडेशनच्या निधीतून खरेदी केलेल्या ८ वाहनांच्या सार्वजनिक सेवेत प्रदान समारंभात ते बोलत होते.

१.२० कोटींची आठ वाहने प्रदान

दक्षिण गोवा जिल्हा मिनरल फाउंडेशनच्या निधीतून सुमारे १.२० कोटी रुपये खर्च करून एकूण आठ नवीन वाहने खरेदी करण्यात आली आणि ती सार्वजनिक सेवेसाठी प्रदान करण्यात आली. या वाहनांमध्ये चार महिंद्रा स्कॉर्पिओ, दोन शववाहिका आणि दोन मिनी पिकअप वाहने यांचा समावेश आहे. ही वाहने आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस खात्याला प्रदान करण्यात आली. दोन पिकअप वाहने विशेषतः सांगे, धारबांदोडा, केपे, काणकोण आणि फोंडा या खाणकाम प्रभावित भागांसाठी देण्यात आली आहेत. याशिवाय, जिल्हा मिनरल फंडातून तीन दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी वाहने देखील प्रदान करण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या निधीचा वापर चांगल्या कामांसाठी केला जात आहे. खाणप्रभावित भागांसाठी पोलीस, स्वच्छता आणि आरोग्य (शववाहिन्या) यांसारख्या विविध कामांमध्ये ही वाहने उपयोगी ठरतील. पुढील वर्षभरात मिनरल फंडाचा वापर आणखी चांगल्या कामांसाठी करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

बिहारच्या निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बिहारच्या निवडणुकीच्या निकालावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बिहार निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठी आघाडी मिळत आहे. दहा वर्षांत डबल इंजिन सरकारने बिहारमधील जंगलराज संपुष्टात आणून विकास केला आहे. जात, धर्म व इतर मुद्दे बाजूला ठेवून विकासाला मतदान केल्याबद्दल त्यांनी बिहारच्या जनतेचे अभिनंदन केले.

हेही वाचा