ऑक्टोबर महिन्यात राज्याचा महसूल ५४५ कोटी

पणजी : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी ) दर कमी केल्याचा थेट परिणाम गोव्याच्या महसुलावर दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्याच्या जीएसटी संकलनात राज्यात ३ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात जीएसटीद्वारे गोव्यात एकूण ५४५ कोटी रुपये महसूल गोळा करण्यात आला आहे, तर गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात हे संकलन ५५९ कोटी रुपये होते.
विशेष म्हणजे, ज्यावेळी गोव्याच्या संकलनात घट झाली आहे, त्याच वेळी संपूर्ण देशाचा विचार करता ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन १ लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. यंदाचे देशाचे एकूण जीएसटी संकलन मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापेक्षा २ टक्क्यांनी जास्त आहे. यावरून कर कपातीचा थेट परिणाम गोव्यासारख्या राज्यांवर अधिक तीव्रतेने होत असल्याचे दिसून येते.
केंद्रीय अर्थ खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ३२ हजार २५ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. यानंतर कर्नाटकमधून १४ हजार ३९५ कोटी रु. तर तामिळनाडूतून ११ हजार ५८८ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. देशात मिझोरम मधून सर्वात कमी ४० कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. केंद्र शासित प्रदेशात दिल्लीतून सर्वाधिक ८ हजार ५३८ कोटी रुपये जीएसटी संकलित करण्यात आला.
अहवालानुसार, एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ मध्ये जीएसटी रूपाने केंद्राने गोव्यातून १,७१८ कोटी, तर राज्याने २,४३५ कोटी रुपये संकलन केले आहे. वरील कालावधीत केंद्र सरकारने इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) मधून गोव्याला दुसऱ्या टप्प्यातील १,४९३ कोटी रुपयांचा वाटा दिला आहे. मागील वर्षी याच सात महिन्यात हा वाटा १,४५१ कोटी रुपये होता. यंदा या वाट्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
.................
अन्य राज्यांमधील जीएसटी संकलन
महाराष्ट्र : ३२ हजार २५ कोटी रुपये.
कर्नाटक : १४ हजार ३९५ कोटी रुपये.
तमिळनाडू : ११ हजार ५८८ कोटी रुपये.
मिझोरम : ४० कोटी रुपये