पोलीस कोठडीतून पळाला

निवारी : लग्न करावे यासाठी विवाहित प्रेयसी मागे लागली. विवाहित प्रियकराने घरात बोलावून बलात्कार करून खून (Murder) केला. मित्रांच्या मदतीने मृतदेह घरातच पुरला. आणि दोन दिवस मृतदेहा जवळच झोपला. ही धक्कादायक घटना घडली आहे, मध्यप्रदेश येथील निवारी जिल्ह्यातील राजपुरा गावात. या क्रूर, अमानवी हत्येच्या घटनेने गाव हादरून गेले आहे.
या खूनप्रकरणी पोलीस सध्या संशयित रतीराम राजपूत याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहित प्रेयसी लग्न करावे यासाठी विवाहित प्रियकराच्या मागे लागली. लग्नापूर्वीच या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. लग्नानंतर ही ते सुरू होते. त्यातून दोघांमध्ये शारीरिक जवळीक ही निर्माण झाली होती. मात्र, विवाहित प्रेयसी रतीरामच्या प्रेमात एवढी वेडी झाली की, पतीला सोडून त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली. दोघांनी लग्न करूया म्हणून वारंवार रतीरामच्या मागे लागली. त्यातून तो एवढा वैतागला की, मित्रांच्या मदतीने त्याने प्रेयसीचा खून करण्याचा कट रचला.
असा रचला कट
त्यानुसार २ ऑक्टोबरला एकटाच असल्याने रात्री संशयिताने विवाहित प्रेयसीला आपल्या घरी बोलावले. रात्री शारीरिक संबंध झाल्यानंतर गळा आवळून खून केला. नंतर मित्र कालीचरण, ज्ञान सिंह व मुकेश यांच्या मदतीने घरातच खोल खड्डा खोदला व मृतदेह तिथे पुरला. आपले बिंग फुटू नये म्हणून जमीन माती टाकून शेणाने सारवली. त्यावर खाट टाकून संशयित त्याच ठिकाणी दोन दिवस झोपला. महिला बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबियांना संशय आला व त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी हिसका दाखवताच संशयिताने खून करून मृतदेह घरात पुरल्याचे सांगितले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर रितसर गुन्हा नोंदवून अटक केली.
संशयित पोलीस कोठडीतून पळाला
पोलीस अधीक्षक डॉ. रायसिंह नरवारिया यांनी सांगितले की, संशयिताने बलात्कार करून विवाहित प्रेयसीचा निघृणपणे खून केला. मृतदेह घरात पुरून ठेवला. त्यानंतर संशयित पोलीस कोठडीत असताना शौचालयात जातो असे सांगून पळून गेला. त्यामुळे दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले. फरारी संशयित व त्याच्या मित्रांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.