गोवा : आयपीएचबीत रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक : मुख्यमंत्री डॉ. सावंत

म्हणाले-'मन कि बात' शेअर करा; तणावमुक्त रहा!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th October, 04:58 pm
गोवा : आयपीएचबीत रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी: गोव्यातील आयपीएचबी संस्थेत कुटुंबियांनी सोडून दिलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची गंभीर माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी गोमंतकीयांना मनमोकळेपणाने भावना व्यक्त करण्याचे आवाहन केले. गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे (Goa State Rural Livelihoods Mission) आयोजित महिलांसाठीच्या मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

'मायेचे' नातलगच रुग्णांना सोडून जातात

मुख्यमंत्री सावंत यांनी आयपीएचबीमधील वास्तविक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, रोव्हेदोरिया मार्फत चालवल्या जाणाऱ्या १० ते १२ केंद्रांमध्ये सध्या सुमारे ३०० ते ३५० रुग्ण आहेत. कुटुंबीय आपल्या प्रियजनांना येथे दाखल करतात आणि त्यानंतर पुन्हा कधीही त्यांना भेटायला येत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे केवळ शारीरिक आरोग्यच नाही, तर मानसिक आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे."

'मन की बात' शेअर करा

मानसिक आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी लोकांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. "आपल्या मनात काय आहे, हे आपण किती जणांना सांगतो? फार कमी, केवळ ५ टक्के लोक! जर पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात'मधून संपूर्ण देशाशी बोलू शकतात, तर आपणही आपली 'मन की बात' एकमेकांशी शेअर करायला शिकले पाहिजे. लोकांशी बोलणे आणि मनातले सांगणे हे दीर्घकाळ मानसिक आजार होण्यापासून वाचवते," असे मत त्यांनी व्यक्त केले.

महिलांनी व्यक्त होणे गरजेचे

घरातील काम सांभाळणाऱ्या महिला बऱ्याचदा आपल्या भावना दडपून राहतात याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. पुरुषांना कामाच्या ठिकाणी, बाजारात किंवा मित्रांसोबत बोलण्याची संधी मिळते. परंतु, आपल्या अनेक भगिनी घरातच राहून घर, मुले आणि कुटुंब सांभाळतात. त्यांना मनातले बोलण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांनी व्यक्त होणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहते, असे त्यांनी सांगितले.

'माझे घर' योजना देणार मानसिक शांती

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकारच्या 'माझे घर' योजनेचा संबंध थेट मानसिक शांततेशी जोडला. मालमत्तेचे वाद आणि घरे पाडण्याच्या भीतीमुळे गोमंतकीयांना मोठा मानसिक ताण येतो, असे ते म्हणाले. दररोज किमान एक व्यक्ती माझ्या कार्यालयात घराशी संबंधित वाद किंवा कुटुंबातील समस्या घेऊन येतो. जर आपण हे प्रश्न सोडवले, तर लोकांना खरी मानसिक शांती मिळेल. म्हणूनच आम्ही 'माझे घर' योजना आणली आहे, ज्यामुळे लोकांना त्यांच्या घराची कायदेशीर सुरक्षितता मिळेल आणि त्यांचा आनंद निर्देशांक वाढेल."

हेही वाचा