‘आप’चा विरोध भाजपला की काँग्रेसला?

माणिकराव ठाकरे : आघाडीबाबत केंद्रीय नेतृत्व घेणार निर्णय


08th October, 12:48 am
‘आप’चा विरोध भाजपला की काँग्रेसला?

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे. सोबत अमित पाटकर, युरी आलेमाव, फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर. (नारायण पिसुर्लेकर)
-
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आम आदमी पक्षाचा (आप) विरोध कोणाला आहे ? भाजपला की काँग्रेसला ? हे त्यांनी स्पष्ट करावे. आपल्या पक्षात काय चालले आहे, हे त्यांनी पहावे. जनतेच्या हितासाठी ‘आप’ने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.
दोन दिवस माणिकराव ठाकरे गोव्यात आहेत. प्रदेश निवडणूक समितीची बैठक घेतल्यानंतर मंगळवारी काँग्रेस हाऊसमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य गिरीश चोडणकर उपस्थित होते. ठाकरे पुढे म्हणाले, गोव्यात भाजप सरकारला काँग्रेसचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा राहिल्याचा आरोप ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. या आरोपामुळे काँग्रेस व ‘आप’मध्ये दरी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन ‘आप’ला केले.
अरविंद केजरीवाल मागील दाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात. भाजपशी कोणाचे संबंध आहेत, ते उघड आहे. दिल्लीतील निवडणुकीत भाजपने ‘आप’चा धुव्वा उडविला. देशातील परिस्थिती आता बदलली आहे. गोव्यासह भारतात राहुल गांधींच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळत आहे. देशात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
गोव्यात भाजपविरोधी पक्षांनी काँग्रेसला आघाडीबाबत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या प्रस्तावावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होईल. केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनंतर आघाडीचा निर्णय होईल. आघाडीसाठी इतर पक्षांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत बोलणे टाळले
प्रदेशाध्यक्षपदावरून अमित पाटकर यांची उचलबांगडी होणार अशी चर्चा आहे. याबाबत ठोस माहिती देण्याचे माणिकराव ठाकरे यांनी टाळले. हा अंतर्गत विषय आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व इतर नेते याबाबत निर्णय घेतील. मी निर्णय घेऊ शकत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा