आप पक्षाला कोणाशी लढायचे आहे? भाजपशी की काँग्रेसशी? : माणिकराव ठाकरे

आप पक्षाने भूमिका स्पष्ट करावी : युतीबाबत केंद्रीय नेतृत्व घेईल निर्णय

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
07th October, 03:24 pm
आप पक्षाला कोणाशी लढायचे आहे?  भाजपशी की काँग्रेसशी? : माणिकराव ठाकरे

पणजी : आम आदमी पक्षाला (Aam Adami Party) कोणाशी लढायचे आहे? भाजपशी की काँग्रेसशी? हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. आपल्या पक्षात काय चालले आहे, हे त्यांनी पहिल्यांदा पहायला हवे. देशाच्या हितासाठी आप पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे (Congress) गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.

गेले दोन दिवस काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे हे गोव्यात आहेत. प्रदेश निवडणूक समितीची बैठक घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधीमंडळ नेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गिरीश चोडणकर उपस्थित होते.

गोव्यात भाजप सरकारला काँग्रेसचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा राहिलेला आहे, असा आरोप आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यांच्या या आरोपामुळे काँग्रेस व आपमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आप पक्षाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे.

अरविंद केजरीवाल हे मागील दाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात. भारतीय जनता पक्षाशी कोणाचे संबंध आहेत, ते उघड आहे. दिल्लीतील निवडणुकीत भाजपने आपचा धुव्वा उडविलेला आहे. देशातील परिस्थिती आता बदललेली आहे. गोव्यासह संपूर्ण भारतात राहूल गांधींच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळत आहे. देशात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

गोव्यात युतीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार

गोव्यात भाजप विरोधी पक्षानी भूमिका स्पष्ट करून काँग्रेसला युतीबाबत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या प्रस्तावावर केंद्रीय नेतृत्वाकडे चर्चा होईल. केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनंतर युतीचा निर्णय होणार आहे. युतीसाठी इतर पक्षानीही पुढाकार घेण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले. 

यावर राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेणार

प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून अमित पाटकर यांची उचलबांगडी होणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत ठोस माहिती देण्याचे ठाकरे यानी टाळले. हा अंतर्गत विषय आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व इतर नेते याबाबत निर्णय घेतील. मी निर्णय घेऊ शकत नाही, असे माणिकराव ठाकरे म्हणाले. 



हेही वाचा