संशयित जॉनी पिंटोच्या खात्यातील २.८० लाख रुपये गोठवले

पणजी : गोठविण्यात आलेल्या बँक खात्याचा वापर गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी करण्यात आला होता, असे निरीक्षण नोंदवत मेरशी येथील विशेष न्यायालयाने संशयित जॉनी पिंटो याच्या बँक खात्यातील २.८० लाख रुपये सोडवण्यास नकार दिला. सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी याबाबतचा आदेश दिला.
गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने (ईओसी) २०२२ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जॉनी पिंटो (मूळ कणकवली, महाराष्ट्र), विशू देव (गोरेगाव, महाराष्ट्र) आणि देवबहादूर नेपाली (नेपाळ) यांनी भागीदारीत प्रथम 'लक्ष्मी ट्रेडर्स' या नावाने वास्को, म्हापसा, डिचोली, मडगाव आणि कुडचडे येथे शाखा उघडून जादा व्याजाचे आमिष दाखवून शंभराहून अधिक गुंतवणूकदारांना गंडा घातला होता.
चौकशीदरम्यान, याच टोळीने पाटो, पणजी येथे 'रुबी ट्रेडर्स' या नावाने कार्यालय उघडून सोन्याच्या नाण्याची योजना दाखवून आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. जॉनी पिंटो आणि देवबहादूर नेपाली यांनी आणखी ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.
खाते सक्रिय करण्याची पिंटोची मागणी न्यायालयाने फेटाळली
आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने प्रकरणाची चौकशी सुरू असताना संशयित जॉनी पिंटो याचे खासगी बँक खाते गोठवले होते. या खात्यातील २.८० लाख रुपये काढण्यासाठी पिंटो याने न्यायालयात अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता सुषमा मांद्रेकर यांनी युक्तिवाद करून, संशयिताने हे बँक खाते गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी वापरल्याची माहिती न्यायालयाला दिली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बँक खाते पुन्हा सक्रिय करून त्यातील रक्कम काढण्यास नकार दिला.