रामा काणकोणकरच्या पत्नीची मागणी; पोलीस महासंचालकांना दिले निवेदन

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा तपास योग्य मार्गाने होत नसल्यामुळे, हा तपास एकतर गुन्हा शाखेकडे द्यावा किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांची पत्नी रती काणकोणकर यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
रामा काणकोणकर यांच्यावर १८ सप्टेंबर रोजी करंजाळे येथे जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्यांच्यावर सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना अटक केली आहे.
जबाब उघड केल्याबद्दल पोलीस निरीक्षकांविरोधात तक्रार
रामा काणकोणकर यांची पत्नी रती काणकोणकर यांनी आज दुपारी पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेतली. भेटीनंतर त्या म्हणाल्या की, रामा काणकोणकर यांनी दिलेला जबाब गोपनीयअसायला हवा होता, तो उघड कसा केला? जबाब उघड केल्याबद्दल मी पणजी पोलीस निरीक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
रती काणकोणकर यांनी तपास योग्य मार्गाने होत नसल्याचे सांगत, तपास गुन्हा शाखेकडे वर्ग करण्याची किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, तपासाची माहिती पोलीस अधीक्षकांनी वेळोवेळी माध्यमांना द्यायला हवी, असेही त्या म्हणाल्या.