गोव्यात रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार : अरविंद केजरीवाल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th October, 04:02 pm
गोव्यात रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार : अरविंद केजरीवाल

पणजी: गोव्यात रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधले जातात, मात्र केवळ तीन महिन्यांत हे नवीन रस्ते खराब होत आहेत. रस्त्यांवर खर्च केले जाणारे पैसे नेमके कुठे जात आहेत, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

सोमवारी पणजी येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. यावेळी 'आप'चे प्रदेश संयोजक अमित पालेकर, आमदार व्हेंजी व्हिएगस व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

'खड्ड्यांत रस्ते' अशी झालीय अवस्था

केजरीवाल म्हणाले की, मागील तीन दिवसांत मी गोव्यामध्ये प्रवास केला. सांताक्रूझ ते म्हापसा, सांताक्रूझ ते मये असा प्रवास केल्यावर मला येथील रस्त्यांची दुरवस्था दिसून आली. सध्या गोव्यात रस्त्यावर खड्डे नसून, खड्ड्यांत रस्ते आहेत, अशी परिस्थिती झाली आहे. खराब रस्त्यांमुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही मोठा त्रास होत आहे. पर्यटनासाठी गोव्याची देशांमध्ये चांगली प्रतिमा आहे. विदेशी पर्यटक हमखास दिल्ली, आग्रा आणि गोवा येथे येतात. मात्र, येथील खराब रस्त्यांमुळे गोव्याची प्रतिमा खराब होत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

'आप'च्या कार्यकर्त्यांना धमकी

सध्या गोव्यात सरकारविरोधात कोणी बोलल्यास त्यांची तोंडे बंद केली जातात. धमकी देणे, मारहाण करणे अशा प्रकारचे प्रकार होत आहेत. 'आप'च्या कार्यकर्त्यांना देखील धमकी देण्यात आली, मात्र आम्ही कुणालाही घाबरत नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. 'आप'ने 'भाजपचे बुराक' (रस्त्यांवरील खड्डे) मोहिमेद्वारे राज्यभरातील एक लाखाहून अधिक लोकांनी चांगल्या रस्त्यांची मागणी केली आहे. ही सर्व कागदपत्रे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील. राज्यातील जनता एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी करत असल्याने मुख्यमंत्री चांगले रस्ते बनवतील, अशी आमची अपेक्षा असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा