मडगाव : केळशीच्या माजी उपसरपंचांसह 'आप' कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

म्हणाले-'भाजपला मदत करणे हाच केजरीवाल यांचा अजेंडा'

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th October, 01:20 pm
मडगाव : केळशीच्या माजी उपसरपंचांसह 'आप' कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

मडगाव: केळशी येथील माजी उपसरपंच रिंकू लोबो, त्यांचे पती पॉल लोबो, समर्थक सॅटर्निनो रॉड्रिग्ज आणि इतर कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाला (आप) सोडचिठ्ठी दिली आहे. 'अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचा राजकीय अजेंडा हा भाजपला सहकार्य करण्याचा आहे', असा थेट आरोप करत त्यांनी पक्षावर जोरदार टीका केली आहे.

सोमवारी बाणावली मतदारसंघातील 'आप' कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. यावेळी केळशीतील 'आप'चे माजी संयोजक आणि प्रवक्ते म्हणून काम केलेल्या पॉल लोबो यांनी पक्षाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

केजरीवाल यांच्यावर थेट टीका

पॉल लोबो यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने (जी केळशीची पंच आणि माजी उपसरपंच आहे) समर्थकांसह 'आप'चा राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, सात-आठ वर्षे 'आप'साठी काम करून बाणावलीत आमदार निवडून आणला, पण जसजसा वेळ गेला, तसतसे 'आप'चे राजकीय हेतू चुकीचे असल्याचे लक्षात आले.

लोबो यांनी केजरीवाल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

राज्यातील 'डबल इंजिन सरकार' गोव्यासाठी घातक आहे, हे स्पष्ट असतानाही केजरीवाल गोव्यात येऊन सत्ताधारी भाजपवर टीका करण्याऐवजी केवळ विरोधी पक्ष काँग्रेसवरच टीका करत असल्याचा त्यांनी आरोप केला. लोबो यांच्या मते, सर्व ४० जागा लढवण्याची 'आप'ने केलेली घोषणा ही केवळ मतांची विभागणी करण्यासाठी आहे. केजरीवाल यांच्या या भूमिकेतून त्यांची पुन्हा भाजपला सत्तेत आणण्याची मानसिकता दिसून येते. सध्या गोवा वाचवणे हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. गोवा वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. यापूर्वी मतविभागणी झाल्यामुळे भाजपला फायदा झाला होता, पण यावेळी गोमंतकीय जनता तसे होऊ देणार नाही, असे मत लोबो यांनी ठामपणे मांडले.

'गोवा संपवण्यासाठीचा अजेंडा'

समर्थक सॅटर्निनो रॉड्रिग्ज यांनीही केजरीवाल यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला. ते म्हणाले, "केजरीवाल हे गोमंतकीयांसाठी नाही, तर भाजपला सहकार्य करण्यासाठी गोव्यात आले आहेत. गोवा संपवण्यासाठीचा हा त्यांचा अजेंडा आहे."

इतर कार्यकर्त्यांनी सांगितले की, बाणावलीत विकासकामे होतील या आशेने त्यांनी 'आप'ला पाठिंबा दिला होता, पण आता पक्षाचे ध्येय सेवा करणे राहिलेले नाही, तसेच काही नेत्यांमध्ये अहंकार वाढल्याचेही दिसून येते. आमदार वेंझी यांनी पक्षश्रेष्ठींना गोव्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा