दर शुक्रवारी साधारणपणे आठवड्याच्या गोष्टी गॅझेटमध्ये प्रकाशित करायच्या असतात. म्हणून शुक्रवार हा बऱ्याच ठिकाणी परीक्षा नोटीफिकेशनचा दिवस समजला जातो.

गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनतर्फे दर महिन्याला काही पोस्ट्स भरल्या जातात. जसजशा जागा उपलब्ध होतात त्याप्रमाणे पोस्टही उपलब्ध होतात. याचे नोटीफिकेशन्स गोव्यातील सर्व आघाडीच्या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध केले जाते. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या 'शुक्रवारी' जीपीएससीच्या जाहिराती पेपरात झळकतात व त्यानुसार त्या विशिष्ट पोस्टसाठीचा सर्व तपशील त्यामध्ये असतो. परीक्षा पद्धती, प्री स्क्रिनिंग, स्क्रिनिंग परीक्षा, लेखी
दीर्घोत्तरी परीक्षा, परीक्षेच्या तारखा, पात्रता, अभ्यासक्रम या सर्व गोष्टींचा ऊहापोह यामध्ये असतो. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने ज्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गोवा सरकारमध्ये 'गॅझेटेड' ऑफिसर व्हायचे आहे, त्याने या शुक्रवारकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ठरते.
ज्युनिअर स्केल ऑफिसर, मामलेदार, बीडीओ, सब रजिस्ट्रार, मेडिकल ऑफिसर, सरकारी शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक, प्राध्यापक, विजिलन्स ऑफिसर, थोडक्यात अनेक Class II ऑफिसर्सची नियुक्ती या जीपीएससीमधून केली जाते. मामलेदार आणि सब रजिस्ट्रार पदासाठी कायद्याचे पदवीधर होणे अनिवार्य आहे. कारण जमीन - जुमला, कायदा, रेव्हेन्यू कायदा, हस्तांतरण कायदा, एविडस अॅक्ट यासारखे विषय त्यांना कामावर असताना हाताळावे लागतात. स्क्रिनिंग परीक्षा व तदनंतर मुलाखत या पद्धतीने जीपीएससीतर्फे पोस्ट भरल्या जातात.
जुनिअर स्केल ऑफिसर हे एक प्रकारे 'डेप्युटी कलेक्टर'ला समकक्ष पोस्ट आहे. जेवढी मोठी पोस्ट तेवढी जास्त परीक्षा. (प्री-स्क्रिनिंग, स्क्रिनिंग लेखी परीक्षा व मुलाखत) असते. काही खालच्या पोस्टसाठी लेखी परीक्षा घेतली जात नाही. युपीएससीची तयारी केलेल्या उमेदवाराला जीपीएससी 'क्रॅक' करणे मुळीच अवघड नाही. त्यामुळे सर्वांनी शुक्रवारचे न्यूज पेपर्स नक्की वाचावेत. दर शुक्रवारी जाहिरात येईलच असे नाही. कारण कमिशनचा आवाका खूप छोटा आहे. त्यात शासकीय नोकऱ्या देखील बोटावर मोजण्याइतक्याच असतात. या आधी यांची ग्रुप A,B,C आणि D या सर्व प्रकारच्या पोस्ट्स जीपीएससीतर्फे भरवल्या जायच्या. परंतु हल्ली गोवा सरकार स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कनिष्ठ स्तरावरील ग्रुप Cआणि D यांची परीक्षा घेऊन भरती करते. त्यामुळे आता जीपीएससीचा स्कोप अजून कमी झाला. अर्थात जीपीएससीला बसणारे विद्यार्थी स्टाफ सिलेकशनच्या ग्रुप C साठी नेहमी बसतातच. त्यामुळे जाहिरातीवर, वर्तमानपत्रावरच फक्त अवलंबून न रहाता कमिशनच्या वेबसाईटवर देखील लक्ष ठेवून असावे किंवा गोवा सरकारच्या इम्लॉयमेंट एक्सचेंजच्या कार्यालयामध्ये यांचे लेटेस्ट अपडेट्स मिळू शकतात.
जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम, परीक्षापध्दती, प्रश्न वगैरेंचा उल्लेख असतो. आता तर स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे अनेक पदे भरणे आहे. याची जाहिरात देखील आलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात स्क्रिनिंग कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आयोजित करण्यात आलेली आहे. ज्युनिअर इंजिनिअर पोस्टसाठी अनेक उमेदवार भरणे आहे. दर शुक्रवारी साधारणपणे आठवड्याच्या गोष्टी गॅझेटमध्ये प्रकाशित करायच्या असतात. म्हणून शुक्रवार हा बऱ्याच ठिकाणी परीक्षा नोटीफिकेशनचा दिवस समजला जातो.

अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)