येथील नाइट ट्रेल हा आमच्यासाठी अत्यंत रोमांचक आणि अनोखा असा अनुभव होता. रात्रीच्या वेळी जंगलाच्या गडद छायेत, अप्रतिम आवाज ऐकत निसर्गाशी जवळीक साधण्याचा अनुभव शब्दात व्यक्त करणे कठीण.

आठवड्यातील कामकाजाचे दिवस संपत आले की वेध लागतात ते ‘शॉर्ट ट्रीप’ करायचे. शॉर्ट ट्रीप म्हणजेच एखादी लहानशी सहल, जर निसर्गाच्या सानिध्यात प्लान झाली मग तर सोने पे सुहागाच! दैनंदिन जीवनाचा एकसुरीपणा घालवण्यासाठी शॉर्ट ट्रीप हीच एक प्रभावी कल्पना. कामाच्या व्यापातून थोडी विश्रांती मिळावी म्हणून आम्ही शॉर्ट ट्रीपला जाण्याचे ठरवले. पण जायचं कुठं? हा प्रश्न होता. कामाच्या दगदगीतून थोडा उसंत म्हणून मेंदूला ताजेतवाने करण्यासाठी कुठंतरी हिरव्यागार, शांत, निसर्गरम्य परिसरात जायचं ठरलं. गूगल महाराजांना विचारलं. रील्स बघितले. तेव्हा निसर्ग पर्यंटकांनी चांगले रिव्ह्यूज् दिलेलं निसर्गरम्य ठिकाण पुढे आलं. सुर्ला- साकोर्डा येथे वासलेलं नेचर्स नेस्ट!
ठरलं! शहराच्या धकाधकीपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यातील ह्या ठिकाणी जायचं यावर सर्वाचं एकमत झालं आणि शनिवारी दुपारी आम्ही नेचर्स नेस्टला जाण्यासाठी बाहेर पडलो. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याजवळ असलेले हे ठिकाण रीलमध्ये पाहिले त्यापेक्षाही जास्त सुखदायक होते. शांत वातावरण, शुद्ध हवा, नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण, मन प्रसन्न करणारे.
नैसर्गिक सौंदर्य आणि अनोख्या अनुभवासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे. आम्हाला सर्वात जास्त भावली ती येथील निरव शांतता. गर्दी नाही, कोणता कल्लोळ नाही; फक्त स्वतःचा निसर्गाशी व निसर्गाचा आपल्याशी संवाद. येथे आम्हाला स्थानिक शैलीतील लहान घरांच्या बांधकामाची छटा पाहायला मिळाली. शेणाने सारवलेली जमीन, मातीने सारवलेल्या भिंती, पक्षांचा किलबिलाट, ढोलीतून बाहेर डोकावणारे साप, रंगीबेरंगी फुले व त्यावर भिरभिरणारी कित्येक फुलपाखरं! परिसरात विविध औषधी व मसाले वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. यात व्हेनीला, इंसुलिन, ब्राम्ही, ऑल स्पाइस प्लांट, नॉनी, यासारख्या अनेक वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे. ह्या वनस्पतींमुळे येथील वातावरणात दरवळणारा एक वेगळा सुगंध आम्ही अनुभवला.
येथील नाइट ट्रेल हा आमच्यासाठी अत्यंत रोमांचक आणि अनोखा असा अनुभव होता. रात्रीच्या वेळी जंगलाच्या गडद छायेत, अप्रतिम आवाज ऐकत निसर्गाशी जवळीक साधण्याचा अनुभव शब्दात व्यक्त करणे कठीण. नाइट ट्रेलसाठी गेलो असता फक्त रात्रीच्या वेळी सक्रिय असणारे वन्यजीव, प्रजनन करण्यासाठी संवाद साधताना काढलेला विशिष्ट आवाज, गडद काळोखात लखलखणारा रातकीड्यांचा थवा, विंचवांची कॉलनी, ग्लायडिंग फ्रॉग व त्याचे नेस्टींग बघितले.
अफलातून अनुभव होता. जंगलातील प्राणी, पक्षी आणि वनस्पतींविशी सुस्पष्ट मार्गदर्शन करणारा एक निसर्ग अभ्यासक (गाईड) आमच्यासोबत होता. चमकणारे जंगल हा नाइट ट्रेलमधील सर्वात चित्तथराराक अनुभव ठरला. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यात खास प्रकारचा एंजाइम (जसे ल्यूसीफेरेस) आणि एक रसायन (जसे ल्यूसीफेरिन) एकत्र येतात आणि प्रकाश निर्माण करतात; याला बायोलुमिनेसंस असे म्हणत असल्याचे आम्हाला गाईडकडून समजले. या प्रक्रियेमुळे जंगलाला जादुई अनुभव प्राप्त होतो. रात्रीच्यावेळी फुलांचा आणि वृक्षांचा
संप्रेरणा देणारा गंध व थंड वाऱ्यामुळे प्रत्येक श्वासात जणू निसर्गाचा स्पर्श अनुभवता येत होता.
निसर्ग भ्रमंती, पक्षी निरीक्षण, जंगल सफारी, फुलपाखरांचे निरीक्षण, नदीकिनारी शांतपणे चालणे इत्यादि गोष्टी आवडणाऱ्या पर्यटकांसाठी नेचर्स नेस्ट एक चांगला अनुभव ठरू शकतो. स्थानिक गोमंतकीय संस्कृतीचे सुंदर मिश्रण दाखवणारे हे एक उत्तम उदाहरण.
इथे स्थानिक संस्कृतीशी संबंधित पारंपरिक कार्यक्रम जसे लोकनृत्याचे प्रकार आणि इतर कार्यशाळादेखील आयोजित करता येत असल्याचे आम्हाला समजले. दुसऱ्या दिवशी आम्ही येथून जवळच असलेल्या तांबडी सुर्ला मंदिरात शिव शंकराचे दर्शन घेतले. निसर्ग वाटेतून जाता आपल्याला राखणदार श्री गडीर देवाचेही दर्शन घेता येते.

स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)