सासष्टी : सुरावलीतील मतदार नोंदी कायद्यानुसारच

जिल्हाधिकारी कार्यालयाचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सुपूर्द

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
05th September 2025, 02:38 pm
सासष्टी : सुरावलीतील मतदार नोंदी कायद्यानुसारच

मडगाव : सुरावली येथील दोन घरक्रमांकावर 100 मतदारांची नोंद असल्याचे समोर आल्यानंतर बोगस मतदार असल्याचा मुद्दा चर्चेला आला होता. प्रत्यक्ष पाहणीअंती जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक कार्यालयाला सादर केलेल्या अहवालात सुरावलीत बोगस मतदार नाहीत, निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार ही नावनोंदणी वैद्य असल्याचे म्हटले आहे.

सुरावली येथील एका घरात अनेक मतदार असल्याचे प्रकरण काही दिवसांपासून गाजत होते. यात काँग्रेसनंतर अ‍ॅड. राधाराव ग्रॅसिअस यांनीही पत्रकार परिषद घेत मतचोरी होत असल्याचा मुद्दा अधोरेखित केलेला होता. ग्रामसभेतही मतदारयादीतील अनेक नोंदीवर आक्षेप घेत मतदारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. त्यानंतर मामलेदार, बीएलओ, उपजिल्हाधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व मतदारांची चाचपणी करण्यास सुरुवात झालेली होती. आता अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष पाहणीअंती मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या पाहणीअंती कोणत्याही प्रकारे बोगस मतदार असल्याचे आढळून आलेले नाही. मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला अहवाल सादर केला असून ब्लॉक लेव्हल अधिकारी, मामलेदारउपजिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जात पडताळणी केली. त्यांनी केलेल्या अहवालानुसार मतदारयादी अनिवासी किंवा अपात्र नावे समाविष्ठ नाहीत. अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत संबंधित मतदार अनेक वर्षांपासून सुरावली येथे वास्तव्यास आहेत.

प्रत्यक्ष पडताळणीनंतर संबंधित मतदार सुरावलीत वास्तव्यास आहेत. वास्तव्याच्या जागेवरील मालमत्तेत उपविभाग व त्यात आणखी उपविभाग आहेत. त्यामुळे नोंदणीकृत मतदारांची संख्या इतरांपेक्षा जास्त दिसते. मतदारांची पडताळणी केलेले घर हे बहुमजली इमारत आहे. ज्यात तळमजल्यासह वरच्या मजल्यावरही आठ खोल्या असून त्यातील ३५ मतदारांची मतदार म्हणून नोंद आहे. त्याशिवाय आणखी १६ व्यक्ती त्याठिकाणी वास्तव्यास आहेत. घराची विभागणी लक्षात घेता निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार मतदारांच्या ज्या नोंदी यापूर्वी करण्यात आलेल्या आहेत, त्या वैध आहेत असे दिसून आल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी सांगितले.

हेही वाचा