कचरा कर वाढवण्यावर विरोधी नगरसेवकांचा आक्षेप

म्हापसा : येथील पालिका मंडळाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १.६५ कोटी रुपये किमतीची सोपो कर निविदा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यमान कंत्राटदारामार्फतच कर वसुलीचे काम सुरू ठेवण्याचा निर्णयही पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली म्हापसा पालिका मंडळाची सर्वसाधारण बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, मुख्यधिकारी चंद्रकांत शेटकर, लेखा तथा प्रशासकीय अधिकारी अभय राणे, नगरसेवक, नगरसेविका, पालिका अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते. तर किशोरी कोरगावकर, नूतन बिचोलकर, चंद्रशेखर बेनकर व स्वप्निल शिरोडकर हे नगरसेवक गैरहजर होते.
सोपो निविदेच्या मुद्द्यावर बोलताना नगराध्यक्षा मिशाळ म्हणाल्या, गेल्या वर्षी सोपो निविदा रक्कम १.८० कोटी होती. मात्र कुणीही बोलिदार पुढे न आल्याने शेवटी ही रक्कम १.५० कोटीवर आणली होती. यावेळी कचरा कर आणि जीएसटी शिवाय १.६५ कोटी निविदा रक्कम निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले असता सर्वानुमते या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सोपो करासोबत विक्रेत्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या ५ रु. कचरा कराची रक्कम १० रु. करावी, अशी विनंती मार्केट समितीचे अध्यक्ष नगरसेवक साईनाथ राऊळ यांनी केली. मात्र, विरोधी नगरसेवकांनी याला आक्षेप घेतला. पालिका रहिवाशांवर वाढीव कर लादत आहे, परंतु आवश्यक सेवा दिली जात नसल्याचा दावा यावेळी तारक आरोलकर यांनी केला.
येथील बार्देश बाझार समोरील मासळी मार्केटच्या दिशेने असलेली जागा पे पार्किंगसाठी अधिसूचित करण्याचा प्रस्तावास विरोधी नगरसेवकांनी हरकत घेतली. ज्या जागा पे पार्किंगसाठी अधिसूचित केलेल्या आहे. तेथील सुविधा प्रथम निर्माण करा. तसेच म्हापसावासीयांसाठी काही जागा पार्किंगसाठी खुली ठेवावी, अशी सूचना नगरसेवक सुधीर कांदोळकर व शशांक नार्वेकर यांनी केली.
तसेच टॅक्सी स्टँडच्या ६३ लाख रु. खर्चाच्या नूतनीकरणाला विरोधक तसेच सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पालिका मंडळासह टॅक्सी स्टँडची संयुक्त पाहणी करून हा प्रस्ताव चालीस लावण्याचा ठराव घेण्यात आला.
गणेशोत्सवात अतिरिक्त करवसुली
गणेश चतुर्थीच्या काळात बाहेरील राज्यातील माटोळी व भाजीपाला घेऊन आलेल्या वाहनांकडून अतिरिक्त म्हणजे १२०० रु. सोपो कर कंत्राटदाराने वसूल केल्याचा मुद्दा नगरसेवक तारक आरोलकर व शशांक नार्वेकर यांनी उपस्थित केला. यावर नगरसेवक साईनाथ राऊळ आणि मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी दिलेल्या उत्तरात मतभिन्नता दिसून आल्याने तुम्ही आपापसात कोणते उत्तर द्यायचे ते प्रथम ठरवा, अशी सूचना नार्वेकर यांनी केली.