पणजी : उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी आमदारांकडून ७५० तारांकीत तर ३,३३० अतारांकीत प्रश्न आमदारांकडून आले आहेत. विरोधकांपेक्षा सत्ताधारी आमदारांचा आकडा अधिक असल्याने सरकारपक्षाचेच प्रश्न चर्चेला येण्याची अधिक शक्यता आहे. तसेच विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी आमदारांमध्ये मतभेद असल्याचे पूर्वीच दिसून आल्याने सत्ताधाऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.
२१ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात १५ दिवस कामकाज चालेल. अर्थसंकल्पाबरोबर खात्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार असून घरे अधिकृत करणारी तीन विधेयके चर्चेला येणार आहेत. अधिवेशनासाठी ७५० तारांकित व ३,३३० आतारांकित प्रश्न आले आहेत. अधिवेशनात येणार असलेली सरकारी विधेयके अद्याप निश्चित झालेली नाहीत, अशी माहिती विधीमंडळ कार्यालयाकडून मिळाली. शुक्रवारी खासगी कामकाजाचा दिवस असेल. एका दिवशी जास्तीतजास्त पाच खासगी प्रस्तावांवर चर्चा होईल. प्रश्नोत्तर सत्रासाठी लॉट पद्धतीने प्रश्नांची निवड होणार असल्याने विरोधी आमदारांनी पूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. यात पुन्हा सत्ताधारी आमदारांची संख्या अधिक असल्याने प्रश्नोत्तरासह चर्चेसाठी सुद्धा सरकार पक्षाच्या आमदारानाच कामकाजात अधिक वेळ मिळण्याची शक्यता आहे.
हिंस्र जातीच्या कुत्र्याच्या बंदीवरील विधेयक येणार चर्चेस
पिटबुल, रॉटवायलरसह हिंस्र जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालणारे विधेयक अधिवेशनात चर्चेत येणार आहे. याशिवाय व्यवसाय सुलभतेची तरतूद असलेले कारखाना व बाष्पक दुरूस्ती विधेयक इतर विधेयकांसह सरकारतर्फे मांडले जाणार आहे. पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून ते ८ ऑगस्टपर्यंत चालेल.