अनाठायी प्राणीप्रेमाला ‘सर्वोच्च’ चपराक!

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्यानंतरही भूतदया दाखविणारे सुधारतील असे वाटत नाही. पणजीसारख्या ‘स्मार्ट सिटी’तही श्वानप्रेमाचे ओंगळवाणे प्रदर्शन अनेक ठिकाणी दिसून येते. अशा बेजबाबदार नागरिकांना ताळ्यावर आणायचे असेल, तर राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणाची गंभीरपणे दखल घेऊन सार्वजनिक स्थळी श्वानांची बडदास्त ठेवणाऱ्यांना चाप लावण्याची गरज आहे.

Story: वर्तमान |
10 hours ago
अनाठायी प्राणीप्रेमाला ‘सर्वोच्च’ चपराक!

‘भटक्या कुत्र्यांना तुम्ही तुमच्या घरात खायला का घालत नाही?’

हा प्रश्न भटक्या श्वानांच्या उपद्रवाला कंटाळलेल्या कोणा सर्वसामान्य माणसाने उपस्थित केलेला नाही. देशाच्या न्यायव्यवस्थेतील अंतिम शक्तिस्थळ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने हा खडा सवाल केला आहे. एका याचिकेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने भटक्या श्वानांचे लाड सार्वजनिक स्थळी न करण्याचे सुचवितानाच याचिकाकर्त्यांनाही चांगलाच दम दिला आहे.

नोएडामध्ये भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक जागी अन्न देणाऱ्या एका महिलेला स्थानिकांनी विरोध केला. अन्न घालण्यापुरते शांत असणारे भटके कुत्रे इतर वेळी हिंसक होतात. सायकलस्वार, दुचाकीस्वार, पादचारी आदींचा पाठलाग करत असल्यामुळे लोकांची भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार असते. अशाच काहींनी याचिकाकर्त्या महिलेला सार्वजनिक स्थळी बेवारस कुत्र्यांना अन्न देण्यास अटकाव केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. यासंबंधी सुनावणी करताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला कठोर शब्दांत फटकारताना, ‘तुम्ही भटक्या कुत्र्यांना तुमच्या घरात का खायला घालत नाहीत?’ असा सवाल केला. ‘सकाळच्या वेळी शहरात सायकल चालवून पहा. या भटक्या कुत्र्यामुळे सायकल चालविणे कठीण होते,’ असे निरीक्षण न्यायपीठाने मांडले. न्यायाधीश विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ‘आम्ही प्रत्येक रस्ता या अशा लोकांसाठी मोकळा सोडायचा का? या प्राण्यांसाठी सर्व जागा रिकाम्या आहेत, पण माणसांसाठीच नाहीत. तुम्ही भटक्या कुत्र्यांना तुमच्या घरातच का ठेवत नाहीत, यासाठी तुम्हाला कुणीही रोखले नाही,’ असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले. त्याचबरोबर भटक्या प्राण्यांविषयी भूतदया असेल, तर त्यांच्यासाठी निवारा केंद्र सुरू करण्याचा किंवा स्वत:च्या घरातच भटक्या कुत्र्यांना खाऊ-पिऊ घालण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला.

प्राणीप्रेम सार्वजनिक स्थळी कशासाठी?

गोव्याच्या कुठल्याही गावात, शहरी भागात रात्रीच्या वेळी निर्धास्तपणे फिरणे शक्य नाही. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद इतका प्रचंड असतो की, दुचाकीवरून जीव मुठीत धरून जावे लागते. कोणत्या क्षणी काळोखातून श्वानहल्ला होईल आणि आपल्याला अस्मान दाखविले जाईल, याची शाश्वती नसते. भटक्या कुत्र्यांना उघड्यावर अन्न घालणाऱ्यांनी तर कहर केल्यासारखी स्थिती आहे. आपल्या प्राणीप्रेमाचे प्रदर्शन करण्याची जणू स्पर्धाच लागल्यासारखे हे लोक भटक्या कुत्र्यांची अन्नाची साेय करताना दिसतात. त्यात आत्मिक समाधानाचा भाग असेल, तर ते चांगलेच आहे. मात्र त्याचा इतरांना त्रास होता नये. भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे शेकडाे लोक जायबंदी होतात. अनेकांचे अपघात होतात. या सर्व गोष्टींना हे तथाकथित प्राणीप्रेमी कारणीभूत असतात. मात्र त्यांना कोणी काही बोललेले रुचत नाही. सार्वजनिक जागी भटक्या कुत्र्यांचे अड्डे निर्माण करणाऱ्या या लोकांना स्थानिक प्रशासनाने चाप लावण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने मांडलेल्या ताज्या निरीक्षणाचा आढावा घेतला असता, अशा श्वानांसाठी निवारा घर किंवा अन्न देण्यासाठी विशिष्ट जागा निश्चित करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. सार्वजनिक सहभागातून डॉग शेल्टर होम चालविल्यास ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.

निर्बिजीकरण हा उपाय नव्हे..!

पशुसंवर्धन खात्याच्या मोहिमेअंतर्गत राज्यात यावर्षी शेकडो भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. दक्षिण गोव्यात बेताळभाटी, कोलवा, माजोर्डा, बाणावली आणि आसपासच्या भागात कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. उत्तर गोव्यात हणजूण, सिकेरी, बागा, कळंगुट, कांदोळी आणि वागातोर भागातील भटक्या कुत्र्यांना निर्बिजीकरणासाठी आसगाव येथील निवारागृहात नेऊन पुन्हा मूळ जागी सोडण्यात आले. या मोहिमेत ३२ लसीकरण पथके, पशुवैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक आणि सहाय्यक कर्मचारी अशा १,५०० कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले. पशुसंवर्धन खात्याने दक्षिण गोव्यात सुमारे ८०० आणि उत्तर गोव्यात १००० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. या मोहिमेला किती यश आले, हे नजीकच्या काळात कळेलच. मात्र केवळ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण हा उपाय नव्हे. अनेक तथाकथित प्राणीप्रेमी असे आहेत की, कुत्र्याचे पिल्लू लहान असताना घरात आणतात आणि ते मोठे झाले, आपली हौस भागली, घरात त्याच्यापासून उपद्रव हाेऊ लागला की हेच प्राणीमित्र गुपचूप कुत्र्याला बेवारस स्थितीत दुसऱ्या गावात किंवा शहरात सोडून देतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या सहजासहजी सुटण्यासारखी नाही. पाळीव प्राण्यांच्या नोंदी ठेवून त्याचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्याचा पशुसंवर्धन खात्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मात्र अंमलबजावणी करण्याबाबतची अनास्था पाहता, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी हा प्रयत्न कितपत उपयुक्त ठरेल, याबाबत शंकाच आहे.

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्यानंतरही भूतदया दाखविणारे सुधारतील असे वाटत नाही. पणजीसारख्या ‘स्मार्ट सिटी’तही श्वानप्रेमाचे ओंगळवाणे प्रदर्शन अनेक ठिकाणी दिसून येते. अशा बेजबाबदार नागरिकांना ताळ्यावर आणायचे असेल, तर समविचारी स्थानिकांनी संघटितपणे सनदशीर मार्गाचा अवलंब करून उघड विरोधाची भूमिका घेण्याची वेळ आली आहे​. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांसाठी हक्काची निवारा गृहे उभारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर दबाव आणायला हवा. लाेकप्रतिनिधींनीही अशा समस्यांच्या मुळाशी जाऊन ठोस उपाययोजनांसाठी आग्रही असायला हवे. या कुत्र्यांमुळे लोकांनी जायबंदी होण्यापेक्षा त्यांच्या संचारावर निर्बंध आणणेच योग्य. राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणाची गंभीरपणे दखल घेऊन सार्वजनिक स्थळी श्वानांची बडदास्त ठेवणाऱ्यांना चाप लावण्याची गरज आहे. अन्यथा लोकांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल. सरकारने लोकांना न्यायालयाची पायरी चढायला लावू नये!

किनारी भागात उच्छाद....

गोव्यातील किनारी भागात तर भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाने कहर केला आहे. माेरजी किनारी भटक्या कुत्र्यांनी स्थानिकाचा चावा घेण्याची घटना परवाच घडली​. त्याआधी जानेवारी महिन्यात दक्षिण गोव्यातील केळशी किनार्‍यावर भटक्या कुत्र्यांनी दोन आठवड्यात १४ जणांचा चावा घेतला. त्यानंतर पंचायतीने शॅक्स, हॉटेल व रेस्टॉरंट प्रतिनिधींची बैठक घेऊन निश्चित जागांवर कुत्र्यांना अन्न द्यावे, किनारी भागात अन्न देऊ नये, असे आवाहन केले होते. एका अहवालानुसार, किनारी भागात दर महिन्याला सरासरी एका व्यक्तीचा भटक्या कुत्र्याकडून चावा घेतला जातो, असे समोर आले आहे. यावर्षीच्या जानेवारी महिन्यातील आकडेवारी भयानक आहे. या महिन्यात कुत्र्यांनी चावे घेतल्याच्या १,७८९ प्रकरणांची नोंद झाली आहे. याचाच अर्थ प्रत्येक दिवशी कुत्र्यांनी सरासरी ५० हून अधिक जणांचे चावे घेतले. यातील पाळीव किती आणि भटके किती हा प्रश्न वेगळा. गोव्यात भटक्या कुत्र्यांची संख्या ६० हजारांच्या आसपास आहे. सरकारी सर्वेक्षणात हा आकडा ५६ हजार इतका नमूद केला आहे. प्रत्यक्षात ही संख्या निश्चितपणे अधिक असू शकते.


सचिन खुटवळकर 
(लेखक दै. गोवन वार्ताचे
वृत्तसंपादक आहेत.)