रवींद्रबाब यांची मुलाखत

आकाशवाणीच्या कारकिर्दीत किती मुलाखती घेतल्यात त्याचा हिशोब नाही ठेवला; कारण त्या असंख्य व विविध विषयांवरील मान्यवरांच्या होत्या. रेडिओसाठी घेतलेल्या रवींद्र केळकर यांच्या मुलाखतीची खास आठवण...

Story: ये आकाशवाणी है |
14 hours ago
रवींद्रबाब यांची मुलाखत

आकाशवाणीच्या कारकिर्दीत किती मुलाखती घेतल्यात त्याचा हिशोब नाही ठेवला; कारण त्या असंख्य व विविध विषयांवरील मान्यवरांच्या होत्या. अशीच एकदा एक संधी चालून आली. रवींद्र केळेकर, जे माझे साहित्यिक मेंटॉर, त्यांची मुलाखत घेण्याची संधी अकस्मात मिळाली. त्यांची मुलाखत घेण्यासाठी एका ज्येष्ठ साहित्यिकांना आकाशवाणीने सांगितले होते. केळेकरांनी रेडिओला कळवले की, मुकेशला सांग. रवींद्रबाबांचे आणि त्या लेखकांचे काही मतभेद झाले होते. असो. मी वयाने लहान होतो. बुजल्यासारखा झालो. ते वेळेवर आले. मी म्हटले – तातो, म्हाका बेठेंच ऑकवर्ड शें जाता (बाबा, मला थोडे ऑकवर्ड वाटत आहे). त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. "मी असताना तुला कशाला संकोचल्यासारखं व्हावं? घरी बसून गप्पा मारतो तशा मार."

आकाशवाणीच्या संचालक सुहासिनी कोऱ्हटकर या स्वागतासाठी तिथे होत्या. मुलाखत सहज सुंदर, प्रियोळच्या कुळागरातील पारदर्शक प्रवाही ओढ्यासारखी पुढे सरकत गेली. केळेकरांचा दुधासारखा शुभ्र, खादी पोषाख व त्यांचं गंभीर वैचारिक स्तरावर विहरणारं व्यक्तिमत्त्व खुलून चमकत होतं. मी एक प्रश्न विचारला – "तुमची भाषाशैली जी इतकी साधी, सोपी, सरळ, सुबोध, सुगम, प्रासादिक आहे, त्याचं रहस्य काय?" त्यांनी तात्काळ सांगितलं – "ती एक कला व साधना. माझ्यात एक शिक्षक आहे, जो सोपं करून सांगतो. क्लिष्ट, कठीण, गहन विषय असला तरी तो सोपा करून सांगायची हातोटी हवी. हे कौशल्य विकसित करावं लागतं. हे मी काकासाहेब कालेलकर यांच्या प्रभावातून शिकलो. पण एक... माझ्या कोंकणीत काही लेखकांसारख्या सुंदर, समर्पक म्हणी येत नाहीत." त्यांनी अतीव नम्रतेने ही गोष्ट सांगितली होती. मनात मी म्हटलं – कदाचित त्यांचं बालपण दीव प्रांतात, वडील डॉक्टर होते तिथं गेलं. त्यामुळे कोंकणी म्हणींचं श्रवण तितकं घडलं नसावं.

अनेक प्रश्न विचारले. त्यांच्याच घरी राजांगणच्या शेजारी वा बाहेरील गॅलरीत बसून गप्पा मारल्यासारखा हा ओघ सहजपणे पुढे सरकत गेला. त्यांच्या चेहऱ्यावरील सत्यनिष्ठ तेज सुख देत होतं. ‘सांगाती’ पुस्तकातील विचार, ‘ओथांबे’ पुस्तकातील लालित्य असे अनेक प्रश्न विचारले. ‘तुळशी’ या लघुकादंबरीवर टेलीफिल्म आली होती, त्यात त्यांचे आर्किटेक्ट चिरंजीव गिरीश केळेकर यांनीही भूमिका केली होती, त्यावर चर्चा झाली.

महाभारत - एक अनुसर्जन असा दोन खंडी ग्रंथ त्यांनी लिहिला. मी त्या वेळी सहावीत होतो. माझी शाळा त्यांच्या घराजवळच होती. अधूनमधून त्यांच्याकडे मी जात होतो. कितीतरी मोठे महाभारत ग्रंथराज एका रूममध्ये मांडले होते – हिंदी, इंग्रजी, गुजराती वगैरे. रवींद्रबाब मोठमोठ्याने डायलॉग मारल्यासारखे एक एक वाक्य विविध शब्दांतून फिरवायचे व नंतर सगळ्यांना विचारून पक्कं करून लिहायचे. मी होतो एकदा तिथंच. "दुर्योधनाक राग आयलो. ताका भिरभिरी मारली. संताप मारलो. शिंवशिंवो मारलो." ते वाचत होते. "गोदू, कसं वाटतं गं?" विचारत होते. इतक्यात त्यांना दोन शब्दांचं वाक्य सुचलं. "दुर्योधन फुरफुरलो." किती बोलकं, अर्थवाही वाक्य हे! "हें घे," गोदूबाय म्हणाली. त्यांनी हसत ते वाक्य लिहिलं. किती श्रम हे उत्कृष्टतेचे व परिपूर्णतेचे! मी त्यावर एक प्रश्न विचारला. ते म्हणाले – "जरा मोठ्याने वाक्य वाचून बघितल्यावर ते फोनेटिकली कसं उतरतं त्याचा अंदाज येतो. कठीण लिहिणं सोपं व सोपं लिहिणं कठीण. सोपं लिहिणं सोपं करण्याची एकमेव पद्धत म्हणजे लहान वाक्यं. पण ती अशा प्रकारे मेहनत करून लिहिली तरच प्रभावी होतात."

रवींद्रबाबांच्या घरातील मोठ्या दुर्बिणीवर व त्यातून त्यांनी निरीक्षण करून लिहिलेल्या ‘ब्रह्मांडांतले तांडव’ या पुस्तकावर अनेक प्रश्न झाले. गोवा मुक्ती लढ्यातील त्यांचा सहभाग, पवनार-वर्धा येथील वर्गमित्र कवी मंगेश पाडगांवकर यांची मैत्री, कोंकणी चळवळीची बुनियाद व त्यांचा सहभाग अशा विविधांगी प्रश्नांनी मुलाखत रंगली. संपली कधी कळली नाही. इतक्यात डायरेक्टर मॅडम आल्या, "छान घेतलीस" म्हणाल्या. तातो (रवींद्रबाब) म्हणाले, "उगाच बुजतो तो. उत्तम झाली." त्यांच्या शाबासकीने मी आनंदलो, मोहरलो.


मुकेश थळी 
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)