प्रारब्ध..!

गौराक्का आजच्या घडीला दोन कोटी रुपयांच्या मालकीण होत्या. तीन मुलगे आणि दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार होता. त्यांच्या नवऱ्याने सारं ऐश्वर्य त्यांच्या नावे केलं होतं आणि ते आपल्याला मिळावं म्हणून धाकट्या मुलीच्या वकील नवऱ्याने कारस्थान करून त्यांना मुलांपासून तोडलं होतं.

Story: कथा |
14 hours ago
प्रारब्ध..!

‘बेड नंबर नऊ गौरक्का गांवकर. कोण आहे त्यांच्यासोबत?’ नर्सने शेजारच्या आजींच्या नावाने पुकारा केला आणि मी पुढे गेले. "काय झालं सिस्टर?" "तू आहेस का त्यांच्यासोबत? त्यांना एक्सरेसाठी न्यायचंय." नर्स म्हणाली आणि मी जरा बावरले. मी माझ्या आईसोबत होते आणि इतक्या वयस्कर व्यक्तीला हाताळण्याचा मला अनुभव नव्हता, तरी मी देवाचं नाव घेऊन तयार झाले. "सिस्टर त्यांच्यासोबत कोणीच नाहीये, पण मीच नेईन त्यांना." मी म्हणाले. "अरे असं कसं कोणी नाही? इतक्या सीरियस पेशंटला दुसऱ्याच्या भरवश्यावर सोडून जातं का कोणी? रात्री काही कमी-जास्त झालं तर तू काय करणार? ते काही नाही, तू त्यांच्या मुलीला बोलावून घे." सिस्टर रागात म्हणाल्या आणि आजींच्या चेहऱ्यावर हतबलता पसरली.

माझ्या आईने त्यांना समजावलं. त्या थोड्याफार सावरल्या. मी त्यांच्या मुलीला फोन केला. तिसऱ्या वेळेस तिने उचलला. तिला मी एक्सरेचं सांगताच तिने उलट मला, "एक्सरे सकाळी मी आल्यावर घ्यायला सांग; मी दूर राहते, आता येऊ शकणार नाही." म्हणत तिने फोन कट केला. मी फक्त त्या येऊ शकत नाहीत एवढंच सिस्टरला सांगितलं आणि मी न्यायची तयारी दाखवली. माझ्या मदतीला लगेच शेजारचे काकाही आलेच. आम्ही दोघांनी आजींना व्हीलचेअरवर बसवलं आणि एक्सरे रूमच्या दिशेने निघालो. आम्हाला एक्सरे रूमच्या दारात सोडून काका माघारी गेले. आजींच्या पुढे एकच पेशंट होता. मी आजींसोबत उभी होते. "बाळ, मी बरी आहे हो. तुला अजिबात त्रास देणार नाही. घाबरू नकोस हो. थोडाफार आधार दे मला." आजी माझी समजूत काढत होत्या, पण मला शब्दशः त्यांची अगतिकता जाणवत होती. ते शब्द ऐकून मला त्यांची कीव आली.

आजींचा अविरत स्वामी नाम जप सुरू होता. त्यांचा नंबर येताच मी त्यांना अलगद उठवलं आणि बेडवर झोपवलं. एक्सरे व्यवस्थित झाला आणि मी परत त्यांना वॉर्डमध्ये आणलं. पुन्हा त्यांच्या बेडवर झोपवलं. त्या आईजवळ माझं कौतुक करत होत्या. लाईट बंद होताच त्या डोळे मिटून पडून राहिल्या. बऱ्याच वेळाने त्यांना झोप लागली. एक-दीड वाजता खाली झोपलेल्या मला आईने हलवून उठवलं आणि मी दचकून उठले. आजींना बाथरूमला जायचं होतं. मी उठले आणि अलगद त्यांच्या हाताला धरून त्यांना नेऊन आणलं. सकाळी मला सात वाजता जाग आली. मी उठलेली पाहून आई घाईघाईने म्हणाली, "अगं जा लवकर आजींना बाथरूमला ने. त्यांना सहा वाजता जायचं होतं, पण तुला उठवायला नको म्हणून तशाच पडून आहेत." ते ऐकून माझ्या काळजात परत कालवाकालव झाली. मी त्यांना बाथरूममध्ये नेऊन बसवलं, तेव्हा म्हणाल्या, "मी बरी आहे हो बाळ. तो दुसरा डायपर दे, मी घालीन; ही पिशवी थोडावेळ धर." म्हणत त्या आत बसल्या आणि मी त्यांच्या पोटाला लावलेली पिशवी धरून बाहेर उभी राहिले.

आवरून त्या बाहेर आल्या; वॉर्डमध्ये येताच नाश्ता आला होता. तो मी त्यांना भरवला. त्यांनी भराभरा खाल्लं. "रात्री संडासला झालं तर तुला त्रास होऊ नये म्हणून संध्याकाळी त्यांनी काही खाल्लं नव्हतं.. बिचाऱ्या.." आई त्यांच्याकडे बघत म्हणाली. खाल्ल्यावर त्यांचा डोळा लागला, कदाचित रात्रभर त्यांना झोप लागली नव्हती. गौराक्का आजच्या घडीला दोन कोटी रुपयांच्या मालकीण होत्या. तीन मुलगे आणि दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार होता. त्यांच्या नवऱ्याने सारं ऐश्वर्य त्यांच्या नावे केलं होतं आणि ते आपल्याला मिळावं म्हणून धाकट्या मुलीच्या वकील नवऱ्याने कारस्थान करून त्यांना मुलांपासून तोडलं होतं. यात त्याला बायकोची खंबीर साथ होती. मोठ्या मुलीच्या नवऱ्याला लकवा मारल्याने ती जवळ येऊ शकत नव्हती. सुना गुणी होत्या, पण कारस्थानी नणंदेपुढे त्यांचंही काही चाललं नाही.

गौराक्काच्या नवऱ्याने शून्यातून निर्माण केलेलं सारं त्यांच्या लोभी जावयाने वेळोवेळी लुटलं. आपल्या मुलांची शिक्षणं, लग्न, व्यवसाय सगळं उभं केलं, पण गौराक्कांना मात्र कधी जुमानलं नाही आणि आता त्या आजारी पडल्यावर त्यांना दवाखान्यात खितपत ठेवलं होतं. मुलं-सुना त्यांना न्यायला तयार असूनही जावई त्यांना त्यांच्याजवळ येऊही देत नव्हता. त्याचं आणि त्याच्या बायकोचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. त्या या सगळ्याला अक्षरशः कंटाळल्या होत्या, पण त्यांचाही नाइलाज होता. "आली का गं शीतल?" त्यांनी बऱ्याच वेळाने मला विचारलं. मी नकारार्थी मान डोलावली आणि पाय मोकळे करायला वॉर्डबाहेर गेले.

"अगं हो, झक्कास झाली पार्टी.. ऑफ कोर्स, यांनी दोन लाखांचा डायमंड सेट गिफ्ट केला मला. इट्स माय गोल्डन ज्युबिली यार...'....' काय त्या थेरडीचं विचारतेस, चांगला मूड बिघडवलास. हो, अजून आहे हॉस्पिटलमध्ये पडून... काल शेजारच्या बाईसोबत तिची मुलगी आली होती, अडकवलं तिच्या गळ्यात लोढणं आणि सटकले तिथून. मध्ये फोन आला होता, एक्सरे की काय म्हणत होती. मी सरळ सांगितलं, दूर राहते, येऊ शकत नाही. त्यांना कुठे माहितीये वीस मिनिटांच्या अंतरावर राहतेय ते.. चल यार, उशीर झालाय; म्हातारी बोंबलेल माझ्या नावाने. बघायला हवंय काय केलंय ते.." म्हणत ती व्यक्ती माझ्यासमोर आली. ती शीतल होती, आजींची मुलगी. काहीच न घडल्याच्या आविर्भावात ती पुढे होऊन माझ्या आईचे आभार मानत होती. मी मात्र ऐकलेल्या शब्दांनी सुन्न पडले होते. माझा हात हातात घेऊन आभार मानणाऱ्या शीतलचा आवाज माझ्या कानांवर पडूनही मला काही ऐकूच येत नव्हतं.


अनु देसाई