वाढत्या अपघातांचा मुद्दा गाजणार

शांत आणि निसर्गरम्य गोवा आता वाढते अपघात आणि गुन्हेगारीमुळे चिंतेचा विषय बनला आहे. दररोज होणारे अपघात अनेक निष्पाप जीवांचा बळी घेत आहेत, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि वाहनचालकांमध्ये शिस्त आणण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या लेखात वाढत्या अपघातांची कारणे आणि संभाव्य उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
14 hours ago
वाढत्या अपघातांचा  मुद्दा गाजणार

शांत व सुशेगाद गोवा अपघात व वाढत्या गुन्हेगारीमुळे सतत चर्चेत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात होतच असतो. या अपघातात बऱ्याच जणांचा हकनाक जीव जात असतो. शुक्रवारी रात्री शिरदोण येथे अपघात होऊन कारचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात वा मृत्यू काही पहिलाच व शेवटचा ठरणार नाही. अपघात वा अपघाती मृत्यूंची मालिका बंद होणे अशक्य असले तरी तिचे प्रमाण कमी व्हायला हवे. दर महिन्याला वाहतूक खाते अपघातांची आकडेवारी जाहीर करते. किती अपघात झाले, किती जणांनी जीव गमावला, किती जण गंभीर जखमी झाले, याचा तपशील त्यात असतो. बऱ्याच वेळेला मागील महिन्यांपेक्षा या महिन्याला झालेल्या मृत्यूंचा आकडा कमी असतो. पुढच्या महिन्याला हा आकडा पुन्हा वाढतो. वर्षाचा विचार केला तर अपघात वा मृत्यूंचा आकडा कमी होत नाही, उलट तो वाढत असतो. सरकार आपल्या परीने जागृती तसेच उपाययोजना करीत असते. मात्र या उपाययोजनांना पाहिजे त्या प्रमाणात यश आलेले नाही. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात वाहनांची तपासणी व नियम उल्लंघन प्रकरणी दंड देण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही वाहनांचा आकडा वाढत आहे. रस्त्यांचे जाळे जसजसे विस्तारत आहे, तसेच वाहनांचा आकडा विस्तारत आहे. यामुळे पार्किंग ही एक मोठी समस्या बनली आहे. पार्किंगबरोबर वाहतूक कोंडीची समस्या वाढत चाललेली आहे. यासाठी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे, त्याशिवाय वाहनचालकांमध्येही शिस्त निर्माण व्हायला हवी.

पोर्तुगीजांच्या राजवटीतून १९६१ साली गोवा मुक्त झाला. मुक्तीनंतर पूर्वीच्या काही वर्षामध्ये विकासाची गती कमी होती. त्यानंतर विकासाची गती वाढत गेली. लोकसंख्याही वाढली. राज्याचे पर्यटन वाढले. याबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली. अपघातांना आळा घालण्यासाठी इतर अनेक उपाययोजनांबरोबर वाहनांचा आकडाही मर्यादित ठेवायला हवा. नियमांचीही कठोर कार्यवाही व्हायला हवी. वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठीचे नियम व अटी कडक करायला हव्यात. परवाना देण्यापूर्वी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण द्यायला हवे.

अपघातांची आकडेवारी वाहतूक खाते देत असते. अपघाताच्या कारणाचाही उल्लेख त्यात असतो. प्रत्येक अपघात होतो, त्याचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास होण्याची गरज आहे. अभ्यासावर आधारित निष्कर्ष काढून अपघातांचा आकडा कमी करण्यासाठी एखादा आराखडा तयार करायला हवा. या आराखड्याच्या कार्यवाहीसाठी एखादी एजन्सी वा यंत्रणेची नेमणूक व्हायला हवी.

खराब व धोकादायक रस्ते हे एक अपघाताचे कारण आहे. तरीही रस्त्यावर खड्डा असला वा तो अरुंद असला तर वाहनाची गती मंदावते. चालकही सतर्क बनतो. याउलट रुंद व गुळगुळीत रस्त्यावर वाहनाचा वेग वाढतो. वाहन चालविण्याचा आनंद लुटताना वाहन चालकाचे गतीवर नियंत्रण राहत नाही. यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढते. रस्ते रुंद करणे वा ते गुळगुळीत करणे रास्त असले तरी यामुळे अपघात वाढण्याचाही धोका असतो. रस्त्यावरील गतीरोधक हा एक वेगळा विषय आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व वाहतूक खात्याने रस्त्यावरील सर्व गतिरोधकांची तपासणी करायला हवी. गतिरोधकाची उंची व रुंदी नियमाला धरून असायला हवी. काही गतिरोधक उंच-सखल असतात. काही गतिरोधक मध्येच उखडलेले आहेत. काही गतिरोधकांपाशी योग्य असे सूचना फलक नाहीत. सूचना फलकाबरोबर गतिरोधक योग्य प्रकारे रंगवायला हवेत. वाहनचालकांना दूरून ते दिसण्यापेक्षा लक्षात यायला हवेत. गतिरोधकांजवळ रिफ्लेक्टिंग लाइट्स असल्यास त्याचा बराच लाभ होतो. राज्यातील सर्व गतिरोधकांची तपासणी होऊन त्यांची दुरुस्ती व्हायला हवी. राज्यातील किमान पन्नास टक्के गतिरोधकांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.

आता वाहन चालविण्याचा परवाना देण्यापूर्वी वाहतूक कार्यालयात जागृतीसाठी व्हिडिओ दाखविला जातो. हा व्हिडिओ दाखविणे योग्य आहे. तरीही वाहन चालविण्याचा परवाना देतेवेळी नवीन चालकाला प्रशिक्षणही देण्याची गरज आहे. यासाठी सरकारने एक, दोन संस्थांची निर्मिती करायला हवी. परवाना मिळाल्यानंतर काही दिवसांचे प्रशिक्षण नवीन चालकाला मिळाले तर त्याचा निश्चितपणे लाभ होईल. वाहन व्यवस्थित चालविण्यास येण्यासह चालकापाशी रोड सेन्स असण्याची गरज आहे. रस्त्यावरील इतर वाहने व एकूण वाहतुकीचा विचार करून चालकाने आपले वाहन चालविण्याची गरज असते. वळण असेल त्या ठिकाणी हॉर्न वाजविणे फार उपयुक्त ठरते. तसेच रात्री वाहने चालविताना डीपर लाईट पेटविणे आवश्यक असते. मोठमोठी अवजड वाहने रात्रीच्या वेळी डीपर लाईट मारत नाहीत. यामुळे समोरच्याला लाईटच्या उजेडात समोरचे वाहन दिसत नाही. या सर्व गोष्टी रोड सेन्समध्ये येतात. बऱ्याच जणांना वाहन व्यवस्थित चालविता येते, मात्र रोड सेन्स नसतो. यासाठी एखाद-दुसऱ्या कार्यशाळेचे आयोजन करायला हरकत नाही. वाहतूक पोलीस व वाहतूक खात्याने यासाठी एखादा उपक्रम सुरू करायला हवा.

सोमवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. खात्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. वाहतूक खात्याच्या मागण्यावेळी वाढत्या अपघातांवर चर्चा होणार आहे. काही आमदार स्तुत्य सूचना मांडतात. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम व रोड सेन्सबाबत जागृती तसेच प्रशिक्षण सुरू व्हायला हवे. याचा तत्काळ फायदा होणार नसला तरी निश्चितपणे दीर्घकालीन लाभ होणार आहे.


गणेश जावडेकर
(लेखक भांगरभूंयचे वरिष्ठ प्रतिनिधी आहेत.)