साहित्य:
२ कप साबुदाणे
२ शिजवलेले बटाटे
७ ते ८ हिरव्या मिरच्या
२ ते ३ आल्याचे तुकडे
१ बारीक कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१ चमचा जिरं
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
कृती:
प्रथम एका भांड्यात २ कप साबुदाणे घ्या. त्यात साबुदाणे भिजतील एवढं पाणी घाला व एक पूर्ण रात्र भिजत ठेवा. तुम्हाला रात्री शक्य नसल्यास निदान ८ ते ९ तास भिजत ठेवा. आता आपण ठेचा करायला घेऊया. प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात ७ ते ८ हिरव्या मिरच्या व २ ते ३ आल्याचे तुकडे घ्या व छान बारीक वाटून घ्या. त्यानंतर साबुदाण्यामधले पूर्ण पाणी काढून घ्या आणि त्यात २ उकडलेले, साली काढून कुस्करलेले बटाटे घाला. बटाटा घालण्याचे कारण म्हणजे जेव्हा आपण वडे करणार तेव्हा मिश्रणाला घट्टसरपणा येण्यासाठी. आता यात १ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, मिरची व आल्याचा ठेचा, १ चमचा जिरं, खूप सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घाला. आता हे वडे तुम्ही उपवासासाठी करत असाल तर कोथिंबीर घालू नका. आता अगदी थोडं पाणी घाला व हलक्या हाताने हे मिश्रण छान एकत्र करा. होईल तेवढे हलक्या हाताने भिजवा. हाताला थोडं थोडं तेल लावून तुमच्या आवडीनुसार वड्यांना आकार द्या. आता एका कढईत वडे तळण्यासाठी तेल तापत ठेवा. तेल तापले की हे वडे कुरकुरीत, मंद गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तुमच्या आवडीनुसार चटणी करून हे वडे खाऊ शकता.
संचिता केळकर