मुलींनी तोंडाला रंग लावून नाटकात काम करणे हे कुलीनपणाला शोभणारे नाही अशा समजुतीचा प्रभाव ग्रामीण भागातील लोकांवर होता. त्यामुळे अंगात कला असूनही मुलींना नाटकात काम करता आले नाही. या कारणामुळे हौशी नाटकात स्त्री कलाकारांची उणीव भासू लागली.
गोव्यातील प्रत्येक लहान-मोठ्या गावात किंवा मागासलेल्या ग्रामीण भागात उत्सवानिमित्त नाटकांचे प्रयोग होणे ही एक परंपराच होती. लहानशा गोव्यात दरवर्षी किती नाट्यप्रयोग होतात, याची गणना केली तर ती संख्या दोन-अडीच हजारांवर जात असल्याचे आढळून येते. पूर्वी नाटक हे मनोरंजनाचे उत्तम साधन होते. त्या काळात टीव्ही वगैरे नव्हते. रस्त्यांवर आजच्याप्रमाणे विजेचे दिवे नव्हते व रस्ताही धड नव्हता. बैलगाडी वगळता रहदारीचे दुसरे साधन नव्हते. तरीही लोक रात्रीच्या वेळी चुडीत पेटवून मोठ्या हौसेने चार-पाच किलोमीटर अंतर चालत जाऊन नाटक पाहायला जात असत. नाटक पाहून परत जाताना लोकांना त्रास होऊ नये, यासाठी नाटक पहाटेपर्यंत संपले पाहिजे याची दखल घेतली जात होती. नाटक संपल्यानंतर घरी परत जाताना कधीकधी चंद्राच्या प्रकाशाची सोबत असायची.
याबद्दल अधिक माहिती देताना साकोर्डा गावाचे निवृत्त प्राथमिक शाळेचे शिक्षक, उत्तम नाट्य कलाकार, हौशी नाटकाचे दिग्दर्शक आणि गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते (नाटककार), गजानन नाईक सांगतात की, त्यांचे वडील नाट्य कलाकार होते. त्यामुळे ते नाटके पाहण्यासाठी साकोर्ड्याहून चालत शिरोडा, फोंडासारख्या भागांत जात असत. ग्रामीण भागातील लोक जंगलवाटेने सात-आठ किलोमीटर अंतर कापून नाटके पाहण्यासाठी जात असायचे. यात महिला व लहान मुलांचाही समावेश असायचा. लोक इतके नाट्यवेडे होते. ते पुढे सांगतात की, रस्त्यावर वीज नव्हती हे सोडाच, पण ज्या ठिकाणी नाटके होत होती त्या ठिकाणीही विजेचा पुरवठा नसल्याने बहुतेक ठिकाणी पेट्रोमॅक्स दिव्यांच्या उजेडात नाटके सादर केली जात होती. हे पेट्रोमॅक्स दिवे विशिष्ट प्रकारचे असायचे. रंगभूमीच्या समोरील मध्यभागी व दोन्ही बाजूला दोरीच्या साहाय्याने पेट्रोमॅक्स दिवे लटकवले जात असत. आजच्यासारखे हाताने हवा भरणारे ते पेट्रोमॅक्स दिवे नव्हते. त्या पेट्रोमॅक्स दिव्यांना सायकलच्या हवा भरणाऱ्या पंपाने हवा भरली जात होती हे विशेष.
सुरुवातीच्या काळात नाटके ही चार-पाच अंकाची असायची. काळानुसार त्यावेळी तशी आवश्यकता होती. कारण नाटक संपल्यानंतर उजेडात लोकांनीं घरी परत जावं हा त्या मागचा हेतू होता. नाटक करणे ही जरी परंपरा असली, तरी नाटकाला येणारा खर्च करण्यासाठी पैसा गोळा करणे हे सुद्धा एक आव्हानच होते. उत्पन्नाची साधने फारसी नसल्याने लोकांच्या खिशात पैसाही नव्हता शिवाय देवालयांकडे (देवस्थान) नाटकाला खर्च करण्या इतपत मिळकतही येत नव्हती. ग्रामीण भागातील हौशी रंगभूमी केवळ लोक वर्गणीवरच अवलंबून होती व आजही आहे. घर वर्गणी, बाजार वर्गणी व नाटकाच्या कलाकारांकडूनही पैसे आकारले जात होते. शिवाय नाटकाच्या अगोदर फुला फळांची पावणी केली जात होती. अजूनही ही प्रथा काही ठिकाणी चालू आहे. त्यातूनच येणारा पैसा नाटकासाठी खर्च केला जात होता.
स्त्री पत्राच्या भूमिकेत पुरुष
जुन्या काळात गोव्यात हौशी रंगभूमीवर केवळ पौराणिक, ऐतिहासिक व काल्पनिक नाटकं व्हायची. पौराणिक नाटक हे हिंदू पुराणातील कथांवर आधारलेले असे. यात रामायण, महाभारतातील कथांचाही समावेश आहे. तर ऐतिहासिक नाटक हे ऐतिहासिक कथा व व्यक्तिरेखांवर आधारित असे. या काळात उत्सवी नाटकातून पुरुष नटच स्त्री भूमिका करीत असत. प्रत्येक गावात अशा खास व्यक्ती होत्या की त्यांनीच स्त्रीभूमिका करायची असे ठरलेलेच असायचे. निदान एक तरी व्यक्ती स्त्रीपात्रासाठी गावात असायचीच. मास्टर काशिनाथ शिरोडकर हे गोव्यातील उत्तम स्त्री भूमिका साकारणारे कलाकार म्हणून गणले जातात. पण त्या काळातही म्हार्दोळसारख्या गावात स्त्रियांचीच एक नाट्यमंडळी होती. ती गावोगावी उत्सवाची निमंत्रणे घेऊन नाट्यप्रयोग करीत असत. यातील पुरुष भूमिका ही स्त्रियाच करीत असत, असे कुळे गावचे ज्येष्ठ साहित्यिक व हौशी रंगभूमीशी निगडित असलेले स्व. पु. शि. नार्वेकर (दादा) यांनी "प्रवाह" या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
साधारण १९६० नंतर स्त्रियांनी रंगभूमीवर पदार्पण केले आहे असे मानले जाते. यात श्रीमती अलका वेलिंगकर, किशोरी हळदणकर, शशिकला नागेशकर, महानंदा अमोणकर इत्यादीचा समावेश आहे. या स्त्री कलाकारांनी गोव्याच्या हौशी रंगभूमीवर आपला वेगळा असा ठसा उमटला. त्यांनी साकारलेला अभिनय दिर्घकाळ प्रेक्षकाच्या स्मरणात राहणारा असाच आहे. त्याकाळी नाटकात काम करणाऱ्या स्त्री कलाकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता व नाटकात काम करणे तुच्छ मानलं जात होते. त्यामुळे नाटकात काम करण्यास विरोध होत होता. तरी काहींनी हा विरोध झुगारून रंगभूमीवर पदार्पण केले असे काही जाणकार लोक सांगतात. महत्त्वाचे म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच स्त्रिया नाटकात काम करीत होत्या. त्यातच त्यावेळी नाटकंही ठराविक होती. त्यामुळे तीच नाटके वेगवेगळ्या गावात सादर केली जात. अशावेळी याच स्त्री कलाकरांना अनेक वेळा एकाच नाटकात काम करण्याची संधी मिळाली व त्यामुळे त्यांचा अभिनय अधिकाधिक रंगत गेला. या काळात जास्तीतजास्त संगीत नाटके होत होती त्यामुळे संगीताची जास्त जाण नसतानाही या स्त्री कलाकारांनी गायनात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली.
मुलींनी तोंडाला रंग लावून नाटकात काम करणे हे कुलीनपणाला शोभणारे नाही अशा समजुतीचा प्रभाव ग्रामीण भागातील लोकांवर होता. त्यामुळे अंगांत कला असूनही मुलींना नाटकात काम करता आले नाही. या कारणांमुळे हौशी नाटकात स्त्री कलाकारांची उणीव भासू लागली. आणि त्याचा फटका हा ग्रामीण भागातील हौशी रंगभूमीला मोठ्या प्रमाणात बसला.(क्रमश:)
उमेश नाईक, कुळे
(लेखक ‘गोवन वार्ता’चे
धारबांदोडा प्रतिनिधी आहेत.)