१६ जुलै रोजी साजरा करण्यात आलेल्या सर्पदिनानिमित्त, पश्चिम घाटातील सापांच्या विविध प्रजातींचे महत्त्व आणि त्यांच्यासमोरील आव्हानांवर प्रकाश टाकणारा हा लेख. पावसाळ्यात अधिक सक्रिय होणारे साप आणि त्यांच्या संरक्षणाची गरज यावर इथे सविस्तर माहिती दिली आहे. १६ जुलै रोजी साजरा करण्यात आलेल्या सर्प दिनानिमित्त...
वनांवर पावसाच्या सरी बरसू लागल्या की बऱ्याच वन्यजीवांच्या हालचाली वाढू लागतात. माणूस ज्याला सगळ्यात जास्त घाबरतो ते सरपटणारे साप वर्षाऋतूत जास्त सक्रिय होतात. पश्चिम घाट हा सापांच्या विविध प्रजातींनी समृद्ध असा भाग आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांच्या सीमेवरील हा डोंगराळ प्रदेश कित्येक सरपटणाऱ्या प्राण्यांना आसरा देतो. पश्चिम घाटात एकूण १२८ सापांच्या प्रजाती आढळून येत असल्याचे अलिकडेच एका संशोधनात्मक अभ्यासात म्हटले आहे. पैकी गोव्यातील पश्चिम घाटाच्या रांगेत सापाच्या एकूण ४५ ते ५० प्रजाती सापडतात; त्यातील १०-१५ टक्के विषारी तर उर्वरित सापांच्या प्रजाती मध्य-विषारी व बिनविषारी गटात मोडतात.
अलिकडच्या वर्षांत पश्चिम घाटात सापांच्या अनेक नवीन प्रजाती आढळल्या आहेत. यामध्ये विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश आहे. यापैकी काही प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. हल्लीच वर्गीकरणशास्त्राच्या अभ्यासानंतर किंग कोब्राच्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या 'भुजंग' सर्पाच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. या प्रजातीला 'ऑफिओफॅगस कलिंगा' असे नाव देण्यात आले आहे.
चार प्रकारचे साप सर्वात विषारी असतात; रसेल व्हायपर म्हणजे घोणस, स्पेक्टॅकल्ड कोब्रा म्हणजे नाग, कॉमन क्रेट म्हणजे मण्यार, सॉ-स्केल्ड व्हायपर म्हणजे फुरसे. ह्या चार प्रजाती सर्वात विषारी आहेत. हिंदू संस्कृतीत विषारी नागाला धार्मिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला नागाची पूजा केली जाते. सॉ-स्केल्ड व्हायपर हा अत्यंत विषारी साप आहे जो त्याच्या अद्वितीय संरक्षणात्मक वर्तनासाठी आणि विषामुळे ओळखला जातो. त्रिकोणी डोके व खवले असलेला हा साप हेमोटॉक्सिक विषासाठी आणि चटदिशी हल्ला करण्याच्या प्रवृत्तीमुळे ओळखला जातो. कॉमन क्रेट हा विषारी साप त्याच्या चमकदार काळ्या-निळ्या शरीरासाठी ओळखला जातो. त्याच्या अंगावर अरुंद पांढरे किंवा फिकट पिवळे पट्टे असतात. त्याचे डोके सपाट व शरीर दंडगोलाकार असते. हा साप प्रामुख्याने रात्रीच्या वेळी सक्रिय असतो. व्हायपर कुळातील रसल व्हायपर हा साप देखील रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो. कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसून राहू शकणारा हा साप त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो.
पश्चिम घाटात आढळणारा असाच आणखीन एक अत्यंत विषारी पण दुर्मिळ साप म्हणजे मलाबार पिट व्हायपर. हा साप सह्याद्रीच्या तिळारी ते महाबळेश्वरच्या पट्ट्यात आढळतो. ह्या दुर्मीळ प्रजातीला नाकाड्या चापडा किंवा हम्प नोज्ड पिट व्हायपर असे म्हणतात. भारतात पिट व्हायपरच्या एकूण ३१ प्रजाती आढळतात. त्यापैकी नऊ प्रजाती पश्चिम घाटात आढळतात. हम्प नोज्ड पिट व्हायपर किंवा नाकाड्या (चापट्या) पिट व्हायपर ही व्हायपरची प्रजाती फक्त पश्चिम घाट व श्रीलंकेत आढळून येते. टोकदार, चपट्या, छोट्या त्रिकोणी आकाराचे डोके असलेला हा साप पाल्यापाचोळ्यात राहतो. हा साप जास्तीतजास्त जमिनीवर, पालापाचोळ्यामध्ये, दगडांखाली आढळतो. जमिनीपासून जास्तीतजास्त अर्धा ते एक फुटाच्या अंतरावरही तो आढळू शकतो.
चापडा तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या अंगावर काळ्याभोर-राखाडी-तपकिरी रंगाचे ठिपके असतात. या सापाचा रंग तपकिरी असल्याने तो पानांमध्ये सहज लपू शकतो. त्याच्या शेपटीच्या टोकाला पिवळा/पांढरा रंग असतो. चापड्या पिट व्हायपर ह्या रंगाचा उपयोग भक्षकाला आकर्षित करण्यासाठी करतो. या सापाचे दात भक्ष्याच्या शरीरात खोलवर दंश करतात, त्यामुळे ह्या सापाचे विष थेट भक्ष्याच्या स्नायूंवर परिणाम करते.
पिट व्हायपर सापाच्या डोळे आणि नाकामधील भागात एक संवेदनशील असे इंद्रिय असते. या इंद्रियाला पिट (खड्डा) असे म्हणतात. या इंद्रियाच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी हा साप इन्फ्रारेड रेडिएशनच्या मदतीने आपली शिकार करतो. ह्या पिट किंवा छिद्रामुळे चापडा आपल्या आजूबाजूला असलेल्या उष्ण रक्ताच्या वन्यप्राण्यांची हालचाल सहज टिपू शकतो. उत्तेजित झाल्यावर तो आपली लालसर पिवळसर उठावदार रंगाच्या शेपटीची जोरदार हालचाल करतो. मादीला आकर्षित करण्यासाठीसुद्धा त्याला या सवयीचा उपयोग होतो. काही पिट व्हायपर मादीला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट आवाज काढतात. नाकाड्या साप अत्यंत विषारी पण दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे नाग, मण्यार, घोणस, फुरसे या अत्यंत विषारी सापांचे अँटिव्हेनम पिट व्हायपरच्या विषावर परिणामकारक ठरत नाही.
मुख्यतः ओलसर घनदाट जंगल हा या सापांचा अधिवास आहे. आज सापांना नैसर्गिक आपत्तींसोबतच कित्येक मानवनिर्मित आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. जंगलतोडीमुळे नष्ट होणारा अधिवास हा सर्वात मोठा मानवनिर्मित धोका आहे. मानवनिर्मित आपत्तीचा परिणाम म्हणून अन्नसाखळीत झालेल्या बिघाडामुळे मोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुर्मिळ सापांच्या घटत चाललेल्या संख्येमागील हेसुद्धा एक कारण आहे.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या
प्राध्यापिका आहेत.)