भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामानंतर समस्या होणार कमी : सिल्वा

५१ कोटींची मंजुरी : सध्या जुन्या वीजवाहिन्या, ट्रान्स्फॉर्मर बदलण्याची कामे सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th July, 11:53 pm
भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामानंतर समस्या होणार कमी : सिल्वा

चिंचणी येथे ट्रान्स्फॉर्मरचे उद्घाटन करताना आमदार क्रूझ सिल्वा. सोबत नागरिक. (संतोष मिरजकर)‍

मडगाव : वेळ्ळी मतदारसंघात अनेक वर्षांपासून विजेच्या समस्या आहेत. वेळ्ळीतील भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांसाठी वीज खात्याकडून ५१ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ते झाल्यावर विजेचे प्रश्न कमी होतील. याशिवाय वीज खांब, कंडक्टर, ट्रान्स्फॉर्मर बदलण्याच्या कामांनाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती आमदार क्रूझ सिल्वा यांनी दिली.
चिंचणी, धर्मापूर व सारझोरा या तीन गावांतील वीज सुविधांमध्ये सुधारणा आणण्यासाठी वीज खात्याकडून गेल्यावर्षी सुरुवात केली होती. यासाठी सुमारे ५ कोटींचा खर्च केला आहे. वीज खात्याकडून वेळ्ळीतील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी पहिल्या टप्प्यात गावातील जुने वीज खांब, कंडक्टर बदलण्यात आले आहेत. त्याशिवाय या कामांतर्गत चार ट्रान्स्फॉर्मर नवे बसवण्यात येणार आहेत. त्यातील दोन ट्रान्स्फॉर्मर आता बदलण्यात आले आहेत. याशिवाय असोळणा, वेळ्ळी, चिंचणी भागातील वीज साहित्यातील सुधारणांसाठी ९ कोटींची कामे करण्यात येणार आहेत. सध्या कोलमोरोड व सारझोरा येथील ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात आले आहेत. वीज खात्याची कामे वेळेवर होण्यासाठी अभियंत्यांसोबत बैठक घेत विहित कालावधी दिला आहे. याशिवाय शेतातून जाणार्‍या वीजवाहिन्या दुसर्‍या बाजूने टाकण्याच्या सूचनाही केल्या आहेत. भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांसाठी अजूनही वर्षभराचा कालावधी जाईल, तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार सिल्वा यांनी केले.
चिंचणीतील ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ
आमदार क्रूझ सिल्वा यांच्या हस्ते चिंचणीतील ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना सिल्वा म्हणाले की, चिंचणीसह वेळ्ळीच्या इतर भागांतून विजेच्या संदर्भात दररोज अनेक समस्या येत असतात. या भागातील वीज खांब, वीजवाहिन्या, कंडक्टर आणि ट्रान्सफॉर्मर हे अनेक वर्षांपासून जुने आहेत. ते बदलण्याची गरज असल्याने त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.