‘नमो ड्रोन दीदी’; गोव्यात महिला बचत गट घडवतायेत शेतीत क्रांती

केंद्रीय योजनेतून १० बचत गटांना अनुदानावर ड्रोन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th July, 11:46 pm
‘नमो ड्रोन दीदी’; गोव्यात महिला बचत गट घडवतायेत शेतीत क्रांती

पणजी : गोव्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील १० महिला बचत गट आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती घडवत आहेत. केंद्राच्या ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेअंतर्गत या बचत गटांना अनुदानावर ड्रोन मिळाले असून, त्यांना ते चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत राबवण्यात येणारी ‘नमो ड्रोन दीदी’ योजना महिला बचत गटांच्या सदस्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांना शेतीत खते आणि कीटकनाशके फवारण्यासाठी ड्रोन भाड्याने देऊ शकतात. या उपक्रमांमुळे बचत गटांच्या वार्षिक उत्पन्नात १ लाख रुपयांची अतिरिक्त भर पडते, ज्यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शाश्वत उपजीविकेला हातभार लागतो, अशी माहिती ग्रामीण विकास खात्याने दिली आहे.
या योजनेअंतर्गत, महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी ८ लाख रुपयांपर्यंत ८० टक्के अनुदान मिळते. उर्वरित २० टक्के रकमेसाठी ३ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध आहे. तसेच, ड्रोन पायलट प्रशिक्षणही योजनेचा भाग आहे. ड्रोनद्वारे खते आणि कीटकनाशके फवारून हे बचत गट १ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळवतात.
गेल्या वर्षी, २०२४-२५ मध्ये १० महिला बचत गटांनी ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेचा लाभ घेतला. केंद्र सरकारने त्यांना खत आणि कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन पुरवले. याशिवाय, केंद्रीय कृषी मंत्रालय राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स कारखान्याद्वारे खते आणि औषधे पुरवते.
ड्रोन वापरासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण
या १० बचत गटांमधील प्रत्येक महिला सदस्याला १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात पाच दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि शेतात खते व कीटकनाशके फवारण्याचे १० दिवसांचे ड्रोन प्रशिक्षण समाविष्ट आहे. तसेच, ड्रोनची विद्युत उपकरणे दुरुस्त करणे, ड्रोन बसवणे आणि इतर तांत्रिक कामांसाठी प्रत्येक गटातील आणखी एका महिला सदस्याला तंत्रज्ञ किंवा सहाय्यक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे ड्रोन सुपूर्द होताच त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.