धारबांदोड्यात सर्वाधिक : आगामी ६ दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी
पणजी : शनिवारी राज्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. राज्यात १ जून ते १९ जुलै दरम्यान सरासरी ६०.७३ इंच पावसाची नोंद झाली आहे. वरील कालावधीत राज्यातील १४ पैकी ७ केंद्रात पावसाने ६० इंचांची सरासरी पूर्ण केली आहे. आतापर्यंत धारबांदोडा केंद्रात सर्वाधिक ८८.३० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात २० मे ते १९ जुलै दरम्यान सरासरी ८५.८३ इंच पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने २० ते २५ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या सहा दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. राज्यात चोवीस तासांत सरासरी १.३७ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान सांगेत ३.४९ इंच, फोंड्यात २.१६ इंच, केपेमध्ये १.९६ इंच, दाबोलीत १.६१ इंच, मुरगावमध्ये १.५७ इंच, पेडण्यात १.३३ इंच, तर धारबांदोड्यात १.२६ इंच पावसाची नोंद झाली.
पणजीत शनिवारी कमाल ३० इंच, तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान २९ अंश तर किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस राहिले. राज्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान २९ ते ३० अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
धरणातील पाणीसाठ्यात वाढ
धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे अंजुणे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मागील तीन दिवसांत अंजुणे धरणातील पाणीसाठ्यात ७ टक्क्यांनी वाढ झाली. शनिवार अखेरीस अंजुणे धरणात ७३ टक्के पाणीसाठा होता. तर चापोलीत ९८ टक्के, साळवली ११६ टक्के, पंचवाडीत १०१ टक्के तर गवाणेमध्ये १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.