साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

राज्यात संततधार पाऊस कायम, रस्ते जलमय, फसवणुकीच्या जाळ्यात सापडले अनेकजण

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
19th July, 10:08 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : पावसाचा जोर या आठवड्यात कायम होता. वास्कोतील वाडे परिसरात दरड कोसळली. म्हादई नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे सोनाळ गावातील संपर्क रस्ता पुन्हा पाण्याखाली गेला. राज्यातील ५० हजार घरे अनधिकृत असल्याचे सांगितल्याने खळबळ माजली होती. याबरोबरच नागरिकांना अज्ञातांकडून गंडा घालण्याचे, तसेच अपघातांचे सत्र सुरूच आहे. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा. 

रविवार 

घरफोडी टोळीतील तिघे पोलिसांच्या ताब्यात

मालपे-पेडणे येथे अज्ञातांनी टॅक्सी चालकावर हल्ला केला होता. रायबंदर येथे घरफोडीही केली होती. या प्रकरणात तुळजापूर (महाराष्ट्र) येथील टोळीचा सहभाग असल्याने त्यातील तिघांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीला मूळ हुबळीतील आणि सध्या वास्कोतील वासीम आणि प्रेम यांनी गोव्यात चोरी करण्यासाठी आणले होते.

केपेतील ज्येष्ठ नागरिकाला १.०५ कोटींचा गंडा

केपे येथील एका ज्येष्ठ नागरिकाला कायदा अंमलबजावणी विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत तक्रारदाराचा एका मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग समोर आल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. या प्रकरणात त्याला १.०५ कोटी रुपयाचा गंडा घालण्यात आला. सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

जखमी दुचाकीस्वाराचा जीएमसीत उपचारादरम्यान मृत्यू

दाबोळी येथे झालेल्या स्वयंअपघातात डोक्याला दुखापत झाल्यानंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) उपचार घेत असलेल्या झुआरीनगर येथील ४० वर्षीय मोटारसायकलस्वाराचे निधन झाले.

सोमवार

राज्यात सुमारे ५० हजार अनधिकृत घरे 

कोमुनिदाद, सरकारी व मालकीच्या जमिनीत मिळून राज्यात सुमारे ५० हजार अनधिकृत घरे आहेत. कोणतेही सरकार ही घरे हटविण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळेच ‘कट ऑफ डेट’ घालून ही घरे अधिकृत करण्याचे विधेयक याच अधिवेशनात येईल, असे पंचायत आणि वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले.  


गोव्याचे नवे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू

माजी केंद्रीय मंत्री पुसापती अशोक गजपती राजू यांची केंद्राने गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. नव्या नियुक्तीमुळे पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

झरी-झुआरीनगर येथे तलवारीने दहशत माजविणाऱ्यास अटक

झरी-झुआरीनगर येथे सोमवारी (दि.१४) सकाळी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या बाचाबाचीप्रसंगी एकाने घरातील तलवार आणल्याने वातावरणातील तणाव वाढला. तथापी इतरांनी हस्तक्षेप करीत त्याची तलवार काढून घेतल्याने तणाव निवळला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वेर्णा पोलिसांनी दखल घेताना परशुराम हरिजन (४१) या तलवारबहादूराविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे.

मंगळवार

कृषी कूळ जमीन फक्त शेतीसाठीच : सर्वोच्च न्यायालय

शेतीच्या वापरासाठी दिलेल्या कुळाच्या जमिनी बांधकाम किंवा इतर कामांसाठी वापरता येणार नाहीत. त्या फक्त शेतीसाठीच वापराव्या लागतील, असा महत्त्वपूर्ण निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला. याबाबतचा निवाडा न्या. सुधांशू धुलिया आणि न्या. अरविंद कुमार या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला आहे. गोव्यातील एका कोमुनिदाद समितीने शेतीसाठी दिलेल्या जमिनीच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

गोविंद गावडेंच्या कार्यकाळातील खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना हटविले 

कार्मिक खात्याने नऊ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. गोविंद गावडे मंत्री असताना त्यांच्या खात्याचे प्रमुख असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सभापती रमेश तवडकर यांना अत्यंत नजीकच्या, तसेच गावडे यांनी दूर केलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. 


अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळाची फेररचना : दामू नाईक

मंत्रिमंडळ फेररचनेबाबत विधानसभा अधिवेशनानंतरच निर्णय घेतला जाईल. सध्या मंत्री, आमदार अधिवेशनाच्या तयारीत व्यग्र आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. 


वाळपई-सोनाळ रस्ता पाण्याखाली 

गेल्या २४ तासांत सत्तरी तालुक्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडला. मंगळवारी सकाळी म्हादई नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे सोनाळ गावातील संपर्क रस्ता पुन्हा एकदा पाण्याखाली गेला.

बुधवार

अवैध रेती उपसा, उच्च न्यायालयाने छापा यंत्रणेविषयी मागवला अहवाल 

उगवे-तेरेखोल येथे बेकायदा रेती उपसा सुुरू असल्याची तक्रार येताच मामलेदार रात्री १२.३० वा. घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना संरक्षणासाठी चार-पाच वेळा फोन केला; मात्र पोलीस सकाळपर्यंत तेथे पोहोचलेच नाहीत. या घटनेची गंभीर दखल घेऊन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने छापासत्राविषयीची यंत्रणा आणि व्यवस्था याबाबत सरकारकडून अहवाल मागवला आहे. 

सावईवेरे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

फोंडा तालुक्यातील सावईवेरे येथे काजूच्या बागायतीमध्ये गेलेल्या दोन शेतकरी बंधूंवर गव्याने अचानक हल्ल्या केला. यात एक शेतकरी जखमी झाला. 

पोलीस असल्याचे भासवून दक्षिण गाेव्यात दागिने लुटण्याच्या दोन घटना

दक्षिण गोव्यातील चिखली व फातोर्डा परिसरात पोलीस असल्याचे भासवून अज्ञाताकडून दोघांकडील सोन्याचे दागिने लुबाडण्यात आले. संशयितांनी अनुसिया विश्र्वनारायण (७५, रा. चिखली) यांची १.८० लाखांची चेन व बांगड्या तसेच फातोर्डा येथील सदा नाईक तारी यांची ६० हजारांची अंगठी चोरी केली. दोन्ही प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

गुरुवार


रोहनने वाममार्गाने मिळवली १०० कोटींपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता 

रोहन हरमलकरने तब्बल १०० कोटींपेक्षा अधिकाची मालमत्ता जमवली, असा दावा ईडीने विशेष न्यायालयात केला आहे. त्याचे बँक खातेही गोठवण्यात आले असून, मालमत्तेचा आकडा शेकडो कोटींपर्यंत जाऊ शकतो, असा संशय आहे. ईडीने या माहितीच्या आधारे हरमलकरचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली आहे. 

भात पिकाच्या आधारभूत किमतीत प्रति किलो २ रुपयांची वाढ

गोवा सरकारने राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाने भात पिकाच्या आधारभूत किमतीत बदल केले असून, यापुढे शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा प्रति किलो २ रुपये अधिक दर मिळणार आहे. 

आयआरबीचा निलंबित कॉन्स्टेबल मंगळसूत्र चोर!

पेडणे तालुक्यातील तोरसे येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मोपा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आयआरबी दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबल निकेश च्यारी याला अटक केली आहे. 

६४ वर्षीय महिलेला १.५२ कोटींचा गंडा

पोर्नोग्राफी आणि मानवी तस्करीशी निगडित समावेश असल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली बार्देश तालुक्यातील ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेला १.५२ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. 

शुक्रवार

जीपीएससीकडून सीबीआरटी परीक्षेच्या पद्धतीत मोठे बदल

गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएससी) सीबीआरटी परीक्षेच्या पद्धतीत बदल करताना पेपर ७५ ऐवजी ६० गुणांंचा केला आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची मर्यादा कमी करून ती ६० टक्यांंवरून ५० टक्के केली आहे. 

निलंबित कॉन्स्टेबल निकेश च्यारी  बडतर्फ 

पेडणे तालुक्यात सोनसाखळी चोरी आणि अल्पवयीन मुलाच्या अपहरणात सहभागी असलेला भारतीय राखीव दलाचा (आयआरबी) निलंबित कॉन्स्टेबल निकेश च्यारी याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.

शनिवार

काणका येथे अपघातात जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

काणका येथील मिल्टन मार्कीस जंक्शनजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या दुचाकी अपघातात लक्ष्मी सावंथी (वय ४५, रा. पर्रा) या महिलेचा उपचारादरम्यान गोमेकॉ रुग्णालयात मृत्यू झाला. दुचाकीवरील पायलटचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

मुसळधार पावसामुळे वाडे परिसरात दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे वास्कोतील वाडे परिसरात शनिवारी सकाळी दरड कोसळली. यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या दीपक गोसावी यांच्या घरामागे माती आणि दगड वाहून आले.  यात घराच्या मागील भागाचे नुकसान झाले. 

लक्षवेधी

झरी-झुआरीनगर येथील खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना पडल्याने स्कूटरस्वार जखमी.

यंदा प्राथमिक शाळा, तसेच विद्यालये सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याकडे ८३ अर्ज आले होते. त्यापैकी तीन अर्जांना मंजुरी दिली आहे. यंदा तीन विनाअनुदानित शिक्षण संस्था सुरू होतील, अशी माहिती शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

पेडणे तालुक्यातील नानेरवाडा येथे भरदिवसा एका घरात चोरीची घटना घडल्याने संपूर्ण बाजारपेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेणुका रामा शिरोडकर यांच्या राहत्या घरात सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने तोडून घरात प्रवेश केला आणि अंदाजे ३ लाखांचे मंगळसूत्र व ७० हजार रोख रक्कम लंपास केली. 

देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील भंडारी समाजाने शुक्रवारी सात जणांचे सदस्यत्व रद्द केले होते. यावर उपेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ॲडहॉक समितीने शनिवारी विशेष बैठक घेऊन देवानंद नाईक यांच्यासह अन्य सहा जणांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा