उपेंद्र गावकर गटाकडून पलटवार
पणजी : देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील भंडारी समाजाने शुक्रवारी सात जणांचे सदस्यत्व रद्द केले होते. यावर उपेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ॲडहॉक समितीने शनिवारी विशेष बैठक घेऊन देवानंद नाईक यांच्यासह अन्य सहा जणांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. समितीचा निर्णय जिल्हा निबंधकांना आज ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रवक्ते संजीव नाईक यांनी दिली.
संजीव नाईक यांनी सांगितले की, आमच्या समितीने देवानंद नाईक यांच्यासह किशोर नाईक, अशोक नाईक, संजय पर्वतकर, मंगलदास नाईक आणि दिलीप नाईक यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या सदस्यांनी वेळोवेळी समाजविरोधी काम केल्याने तसेच बेकायदेशीर कृत्ये केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हा निबंधकांकडून मिळालेल्या माहिती अधिकारानुसार याबाबत आम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्याचा संदर्भ आम्ही जोडला आहे.
यापूर्वी देवानंद नाईक गटाने समाजाच्या कार्यकारिणीत सदस्य असणारे अविनाश शिरोडकर, बाबू नाईक, परेश नाईक, विनोद नाईक यांच्यासह प्रभाकर नाईक, रोहिदास नाईक आणि हनुमंत नाईक यांचे सदस्यत्व रद्द केले होते. समाजाच्या बैठकीस उपस्थित न राहणे आणि समाजाच्या विरोधात काम करणे असे आरोप लावून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. रिक्त झालेल्या कार्यकारिणीच्या जागेवर लवकरच निवडणूक घेणार असल्याचे अध्यक्ष देवानंद नाईक यांनी सांगितले.