राज्यभरात सहा STEM लॅब्स उभारण्याचा मानस
पणजी : गोव्याच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात नवोन्मेष आणि डिजिटल कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आज शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखळीतील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात अत्याधुनिक STEM लॅबचे उद्घाटन करण्यात आले. ही लॅब ONGCच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत गोवा CSR प्राधिकरणामार्फत उभारण्यात आली आहे. राज्यभरात सहा अशा लॅब्स उभारण्याचा उपक्रम असून, त्यातील ही एक आहे.
या लॅबमधून विद्यार्थ्यांना विज्ञान, रोबोटिक्स आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत - २०४७ या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील उद्दिष्टांशी ही लॅब सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत उत्तरेकडील गोव्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठी झेप असल्याचे सांगितले. ही लॅब विद्यार्थ्यांमध्ये अनुभवाधारित शिक्षण, चिंतनशक्ती, समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि जिज्ञासा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सैद्धांतिक शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यामधील दरी भरून काढत, विद्यार्थ्यांना STEM क्षेत्रातील करिअरसाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरेल, असा आशावाद शिक्षकांनी व्यक्त केला.
या STEM लॅब्सच्या माध्यमातून गोव्याने आधुनिक शिक्षण पद्धत अंगीकारण्यात आघाडी घेतली असून, राज्यातील तरुणांना नवोन्मेष आणि ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेसाठी सक्षम बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.