सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
पणजी : गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या बागा परिसरात आज शनिवारी सकाळी ७च्या सुमारास एक मोठा अपघात टळला. वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाडीला जोरदार धडक दिली. यात हातगाडीचे नुकसान झाले तर अन्य एका वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्या वेळी हातगाडीजवळ कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. काही क्षणांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात घेतली. प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त कार अतिवेगात होती आणि चालकाने गाडीवरील नियंत्रण पूर्णतः गमावले होते. चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, हे तपासण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
बागा परिसर तसेच इतर किनारी भागांत देखील रात्रीच्या वेळी पर्यटकांकडून मद्याच्या धुंदीत बेदरकारपणे वाहने चालवली जातात. यामुळे अनेकदा गंभीर अपघात घडले आहेत. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी पोलिसांना अधिक गस्त वाढवण्याची आणि वेगमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी विशेष उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.