आमदार साळकरांचे मदतीचे आश्वासन
पणजी : मुसळधार पावसामुळे वास्कोतील वाडे परिसरात आज शनिवारी सकाळी दरड कोसळली. यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या दीपक गोसावी यांच्या घरामागे माती आणि दगड वाहून आले. यात घराच्या मागील भागाचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मदतकार्य सुरू केले. मदतकार्य सुमारे तासभर सुरू होती. यावेळी स्थानिक आमदार कृष्णा साळकर यांनी घटनास्थळी भेट देत गोसावी कुटुंबियांची भेट घेतली आणि तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.
वाडे परिसरात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे या भागासाठी ९ कोटी रुपयांच्या खर्चाने संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच त्यावर कार्यवाही होणार आहे, अशी माहिती आमदार साळकर यांनी दिली. दरड कोसळल्याच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली आहे.