चौघा जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू
पणजी : पणजी ते मडगाव महामार्गावरील बांबोळी-शिरदोण फ्लायओव्हरवर शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार,रेनॉ कार पणजीहून वास्कोला जात होती. चालकाचा ताबा सुटल्याने रेनों कारने दुभाजकाला धडक देऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारसह दुचाकीला धडक दिली. या तिहेरी अपघातात कारमधील एक प्रवासी जागीच ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये इनोव्हा कारमधील दोन प्रवासी आणि दुचाकीवरील दोन युवकांचा समावेश आहे. सर्व जखमींना तत्काळ गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच आगशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी शिरदोण फ्लायओव्हरवर वाहतुकीसाठी आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा उभी करावी, वेगमर्यादा लागू करावी असे म्हटले आहे. अपघात झालेल्या भागात पावसाचे पाणी साचते. अपघातप्रवण भाग असल्याचे सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत, असे या महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या चालकांचे म्हणणे आहे
(बातमी अपडेट होत आहे)