दक्षिण आफ्रिका पहिल्या विश्वविजेत्यापदानजिक

विजयासाठी केवळ ६९ धावांची आवश्यकता : एडन मारक्रमचे शतक, बवुमाचे अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
14th June, 12:32 am
दक्षिण आफ्रिका पहिल्या विश्वविजेत्यापदानजिक

लंडन : दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्याचा उंबरठ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ ६९ धावांची आवश्यकता असून त्यांचे ८ गडी शिल्लक आहेत.
२८२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज जिद्दीने खेळपट्टीवर टिकून राहिले. सुरूवातीला २ मोठे धक्के बसले. पण त्यानंतर कर्णधार तेंबा बवुमाने शानदार अर्धशतकी खेळी केली आणि एडन मारक्रमने दक्षिण आफ्रिकेसाठी अतिशय महत्वाच्या सामन्यात शानदार शतकी खेळी केली. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या कुठल्याही फलंदाजाला आयसीसीच्या फायनलमध्ये शकत झळकावता आले नव्हते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि एडन मारक्रमसाठी हे शतक ऐतिहासिक ठरले आहे.
दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २८२ धावांची गरज होती. लॉर्ड्सच्या मैदानावर इतक्या मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग करणे मुळीच सोपे नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे ते पाहता आता हा पाठलाग सोपा वाटू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिक्लटन आणि एडेन मारक्रमची जोडी सलामीला आली. या दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, रिकल्टन अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला. त्याला ८ चेंडूत अवघ्या ६ धावा करता आल्या. रिकल्टन बाद झाल्यानंतर, मुल्डरने एडेन मारक्रमची चांगली साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी मिळून ६१ धावा जोडल्या. दोघांची जोडी जमली होती. मात्र, चेंडू थांबून आला आणि मुल्डर २७ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला.
एडन मारक्रमने या डावात १५७ चेंडूंचा सामना करत ११ चौकारांच्या साहाय्याने आपले शतक पूर्ण केले. सामन्यातील चौथ्या डावात गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. याचा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. चेंडूला उसळी आणि स्विंग मिळत नव्हता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धावा करणे सोपे झाले. मात्र, खेळपट्टीवर टिकून राहण्याचे मोठे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसमोर होते. तेंबा बवुमा आणि मार्करम ही जोडी खंबीरपणे उभी राहिली. दोघांनी मिळून १५० पेक्षा अधिक धावा जोडल्या. यादरम्यान टेंबा बावुमानेही अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी दोन्ही बळी स्टार्कने घेतले.
दरम्यान, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ ७३ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे मोठी धावसंख्या उभारून दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी मोठे आव्हान देण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्कला वगळले, तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. सलामीला फलंदाजीला आलेल्या मार्नस लाबुशेनने २२ धावांची खेळी केली. तर पहिल्या डावात शून्यावर माघारी परतलेला उस्मान ख्वाजा दुसऱ्या डावातही स्वस्तात माघारी परतला. तो ६ धावांवर माघारी परतला. तर कॅमरून ग्रीन शून्यावर माघारी परतला. संघातील प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. ट्रॅव्हिस हेडला अवघ्या ९ धावा करता आल्या. पहिल्या डावात शानदार फलंदाजी करणाऱ्या ब्यू वेबस्टरने दुसऱ्या डावात अवघ्या ९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात अॅलेक्स कॅरी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ४३ धावांची खेळी केली. कॅरीने मिचेल स्टार्कसोबत मिळून शानदार अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. शेवटी मिचेल स्टार्कने ५८ आणि जोश हेजलवूडने १७ धावांची खेळी केली. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाची धावसंख्या २०७ धावांपर्यंत पोहोचवली.
दक्षिण आफ्रिकेचा डाव १३८ धावांवर आटोपला
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फलंदाजीसाठी आले. दक्षिण आफ्रिकेकडे या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजही स्वस्तात माघारी परतले. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करम आणि रियान रिकल्टनची जोडी मैदानावर आली. मात्र, या जोडीला हवी तशी सुरूवात करता आली नाही. मार्करम शून्यावर माघारी परतला. तर रिकल्टन १६ धावांवर माघारी परतला. मुल्डरने ६ धावांची खेळी केली. तर टेंबा बावुमाने ३६ धावांची खेळी केली. बेडिंघम हा पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ४५ धावांची खेळी केली.
स्टार्कचा विक्रम
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, मिचेल स्टार्कने एका टोकाकडून डाव सावरत नाबाद ५८ धावांची खेळी करून संघाला सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्टार्कने त्याच्या खेळीच्या जोरावर एक खास विक्रमही आपल्या नावे केला आहे.
मिचेल स्टार्कने १३६ चेंडू खेळत ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. ही धावसंख्या ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात फलंदाजाने केलेली सर्वाेच्च धावसंख्या होती. याचबरोबर जोश हेझलवूडने देखील स्टार्कला चांगली साथ दिली आणि मोठी भागीदारी रचली. स्टार्कने या खेळीमुळे आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात एक अनोखा टप्पा गाठला. त्याच्या या खेळीमुळे तो नवव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका डावात ४० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू बनला. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या कोर्टनी ब्राउनच्या नावावर होता, ज्याने २००४ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या संस्मरणीय खेळीदरम्यान हा पराक्रम केला होता.

स्टार्क, हेजलवूडची विक्रमी भागिदारी
यासह मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. शेवटच्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करताच या जोडीने बीजे वॉलटींग आणि ट्रेंट बोल्टच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. या जोडीच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या विकेटसाठी ३ वेळेस अर्धशतकी भागीदारी करण्याची नोंद आहे. आता स्टार्क आणि हेजलवूड या जोडीने देखील ३ वेळेस असा कारनामा करत बोल्ट आणि वॉलटींगच्या जोडीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
संघातील प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर, मिचेल स्टार्कने फलंदाजीत कमाल कामगिरी केली. शेवटच्या विकेटसाठी स्टार्क आणि हेजलवूड मिळून ५९ धावा जोडल्या. पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात कुठल्याही जोडीने ५० पेक्षा अधिक धावा जोडल्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली आणि जेफ थॉमसन या जोडीच्या नावावर होता. या जोडीने १९७५ मध्ये वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात ४१ धावांची भागीदारी केली होती.
शेवटच्या गड्यासाठी सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी

मिचेल स्टार्क- जोश हेजलवूड- ३ वेळेस

बीजे वॉलटींग- ट्रेंट बोल्ट – ३ वेळेस

सिडनी कॅलावे- अल्बर्ट ट्रॉट – २ वेळेस
अॅलेन डोनाल्ड- शॉन पोलॉक- २ वेळेस
पॉल अलॉट- बॉब विल्स- २ वेळेस
अंतिम सामन्यात दहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी
मिचेल मार्श- जोश हेजलवूड – ५९ धावा ( वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, २०२५)
डॅनिस लिली – जेफ थॉमसन- ४१ धावा ( वनडे वर्ल्डकप, १९७५)
सईद किरमानी – बलविंदर संधु – (वनडे वर्ल्डकप, १९८३)
आयसीसी फायनलमध्ये तळाच्या फलंदाजाची सर्वाधिक धावसंख्या
मिचेल स्टार्क – ५८ धावा – ९व्या क्रमांकावर फलंदाजी – डब्ल्यूटीसी फायनल २०२५
कोर्टनी ब्राऊन – ३५ धावा – ९व्या क्रमांकावर फलंदाजी – चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल २००४
इआन ब्रॅडशॉ – ३४ धावा – १०व्या क्रमांकावर फलंदाजी – चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल २००४
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव २१२, दुसरा डाव २०७
दक्षिण आफ्रिका : पहिला डाव १३८, दुसरा डाव २ बाद २१३
क्रिकेट मैदानही झाले स्तब्ध
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या सामन्यात सर्व खेळाडू आणि पंचांनी त्यांच्या हातावर काळी पट्टी बांधली होती. याद्वारे अपघातात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत या सामन्याचा भाग नाही, परंतु भारतातील या अपघाताने सर्वांनाच दुःख दिले आहे. शुक्रवारपासून भारत आणि भारत अ संघात संघांतर्गत सामना खेळवला गेला. या सामन्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल, रवींद्र जडेजा यांच्यासह सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. यासोबतच अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळण्यात आले.