जत्रांच्या व्यवस्थापनासाठी आता एसओपी; समन्वय अधिकाऱ्याची व्यवस्था
प्रतिनिधी। गोवन वार्ता
जत्रेपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जत्रेच्या स्थळाची पाहणी केली होती. बैठका झाल्या. मात्र बैठकीत झालेल्या निर्णयांची कार्यवाही झाली नाही.
पणजी : शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी जबाबदार असलेल्या आठ अधिकाऱ्यांना सरकारने चौकशीसाठी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. घटना झाली तेव्हाचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, डिचोली उपजिल्होधिकारी, डिचोली पोलीस उपअधीक्षक, डिचोली मामलेदार, डिचोली पोलीस निरीक्षक, मोपा पोलीस निरीक्षक आणि शिरगाव पंचायत सचिव यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून ही माहिती मिळाली. पोलिसांत नोंद झालेल्या गुन्ह्याची चौकशी सुरूच राहील. शिरगावसह गर्दी होणाऱ्या जत्रांच्या व्यवस्थापनासाठी विशेष एसओपी तयार केली जाईल. त्याबरोबरच समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी संदीप जॅकीस यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने अहवाल सादर केला. या अहवालाची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उघड केली. लईराई देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस, शिरगाव पंचायत आणि काही धोंडांची वागणूक चेंगराचेंगरी होण्याला जबाबदार ठरली. चौकशी समितीने या पाच गोष्टींवर ठपका ठेवला. चौकशी समितीच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
चौकशी समितीने अहवालात नोंदवलेली निरीक्षणे
काही धोंड बेशिस्तपणे तळीकडून होमकुंडकडे जाऊ लागले. त्यामुळे गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. देवस्थान समितीने गर्दीचा विचार करून सुरक्षेचे उपाय योजले नाहीत.
पोलीस तसेच प्रशासकीय समितीने सहकार्य केले नाही. गर्दी आणि रस्त्याचा विचार करून रस्त्यावर दुकानांना मंजुरी देणे अयोग्य होते.
तळी आणि होमकुंडनजीक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था नव्हती. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे शक्य होते. नियोजन आणि समन्वयाची कमतरता होती. गर्दी लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी घटनास्थळी थांबणे गरजेचे होते.तळी ते होमखंडपर्यंतच्या रस्त्यावर दरवर्षी गर्दी असते. एंट्री आणि एक्झीटसाठी स्वतंत्र मार्गांची व्यवस्था करणे आवश्यक होते.
पोलीसांची संख्या अधिक होती; मात्र आवश्यक जागांवर पोलीस कमी होते. ड्रोन, निरीक्षण टॉवरांची व्यवस्था नव्हती.शिरगाव पंचायतीने तळी ते होमकुंडपर्यंतच्या रस्त्यावरील दुकानांना वीजजोडणी देण्यासाठी ‘ना हरकत’ दाखला दिला. रस्ता अरुंद असल्याने दुकानांना वीजजोडणी देणे अयोग्य होते.
चौकशी समितीच्या शिफारसी
घटनेची सखोल चौकशी करा.
देवस्थान समिती बरखास्त करून प्रशासक नेमा.
शिरगावसह गर्दीच्या जत्रांसाठी व्यवस्थापन आराखडा हवा.
गर्दीच्या व्यवस्थापनासाठी बॅरिकेड्स घाला, दुकाने नको.
होमखंड दिवशी फक्त धोंडांना प्रवेश द्या. अन्य भाविकांना प्रवेश नको.
सीसीटीव्ही, ड्रोन, तसेच वॉच टॉवर्सची व्यवस्था आवश्यक आहे.
मॉकड्रिल तसेच स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण द्या.
दुकाने आणि विक्रेत्यांसाठी व्यवस्थापन हवे.