विविध बुलेटीनं

सोशल मिडिया नसल्याने त्या काळी गोवाभरचे लोक रेडीयोला कान लावून बसत. बुलेटीनमध्ये आम्ही कोण आघाडीवर आहे, मतमोजणीच्या किती फेऱ्या झाल्या आहेत ते सांगत असू.

Story: ये आकाशवाणी है |
17 hours ago
विविध बुलेटीनं

पणजी रेडीयोवरून एक बुलेटीन आम्ही प्रसारीत करायचो. ‘ह्यूमन इंटरेस्ट बुलेटीन’. एकाच वेळेला देशभर हे साप्ताहिक बुलेटीन संबंधित प्रादेशिक भाषेत जायचं. या वृत्तपत्राला आम्ही ‘लोकांरूची खबरो’ असं नाव दिलं होतं. 

हे इंग्रजी बुलेटीन आम्हाला टेलीग्रामनं यायचं. नंतर फॅक्स आल्यावर फॅक्सनं यायचं. त्या काळी ईमेल नव्हतं. या बुलेटीनमध्ये गमतीशीर बातम्या असायच्या. श्रोत्यांना ते वृत्तपत्र भारी आवडायचे. त्यात विनोदी, अनवट बातम्या असायच्या. ‘चीनमध्ये कुठं तरी भूकंप झाला. घरं गाडली गेली. माणसं गाडली गेली. मार्केट मातीखाली गेलं. मदतकार्यावेळी एक रहिवासी कुठं तरी अडगळीच्या जागी अडकलेला सापडला. पंधरा दिवस तो तिथं टॉमेटोची टोपली सांडली होती. त्यातले टॉमेटो खाऊन जिवंत उरला होता. त्याला मदत पथकाने सुखरूपपणे बाहेर काढलं.’ अशा प्रकारच्या या बातम्या असत. 

या बातम्या वाचण्याचा ‘टोन’ आम्ही किंचित वेगळा, चवदार, नाट्यमय ठेवत असू. बातम्या अनुवादित करताना अल्पसं लालित्य वा कोंकणी म्हणींचं पीठ लावत असू. त्यामुळे ते रंजक होई. कालांतरानं हे ‘ह्यूमन इंटरेस्ट बुलेटीन’ बंद पडलं.

स्थानिक प्रादेशिक समाचार विभागाकडून विविध प्रकारची बुलेटीनं प्रसारित होतात. त्यात ‘तालुका वृत्तपत्र’ असे. गोव्यातील बारा तालुक्यांची वृत्तपत्रे आम्ही आळीपाळीने प्रसारित करत असू. रिपोर्टर ती पाठवत असे. अनेक हस्तलिखितं. हाताने लिहिलेली ही बुलेटीनं लाईव्ह वाचताना वा ध्वनीमुद्रीत करून वाचताना फार काळजी घ्यावी लागे. कारण त्यांचं अक्षर. ‘र’ की ‘ट’,  ‘ळ’ की ‘ल’ हे कळणं कधी कधी मुष्कील होई. काहींची अक्षरे वाचणं मुष्कीलच होई. पण सवयीने मला ते अंगवळणी पडलं होतं.

कालांतरानं संगणक आले. पण अजूनही अनेकांना ‘टंकन’ म्हणजे ‘कंपोजिंग’ जमत नाही. छापील अक्षर वाचताना चुकायची शक्यताच नसते. विधानसभा निवडणूक वा लोकसभा निवडणूक निकाल देणारी खास बुलेटीनं असत. मोबाईल नव्हते त्या काळी पणजी आणि मडगांव या दोन मतमोजणीच्या ठिकाणी ‘हॉट लाईन’ फोन सेवा लावली जाई. मतमोजणी कार्यालयात फोन उचलला की रेडीयो वृत्तकक्षात खणखणायचा. पणजी रेडीयोतून फोन उचलला की पणजी वा मडगांवच्या मतमोजणी कक्षात फोन वाजत असे. आता मोबाईल असल्याने अशा सेवेची गरज नाही.

कोंकणी इलेक्शन बुलेटीन अर्ध्या वा एका तासाच्या इंटरवलमध्ये प्रसारित केली जात. इतर सोशल मीडिया नसल्याने त्या काळी गोवाभरचे लोक रेडीयोला कान लावून बसत. बुलेटीनमध्ये आम्ही कोण आघाडीवर आहे, मतमोजणीच्या किती फेऱ्या झाल्या आहेत ते सांगत असू. नेमकी मतं किती पडली आहेत ती त्वरीत स्टुडीयोत जाऊन वाचणं हे सोपं नव्हतं. कारण ४८६७, ३९६ हे मतांचे आकडे नव्या पिढीच्या वृत्तनिवेदकांना वाचायला कसे आव्हानात्मक असत तेही मी जवळून पाहिलं. इंग्रजी संख्या कागदावर पाहून चार हजार आठशे सदुसष्ट, हे न अडखळता एका प्रवाहामध्ये वाचणं हे तितकं सोपं नसतं. ‘चार हजार आठशे सदुसष्ठ’ हे अक्षरात लिहायला वेळ कसा असणार? मतमोजणीचे आकडे धो धो बरसत असत. ही इलेक्शन बुलेटीनं मात्र अती वेगात तयार करावी लागत. धावपळ असे नुसती. पण त्यात गंमत असे. मजा असे. आनंद असे. एक विजेसारखं थ्रील असे.

सगळी मतमोजणी संपल्यावर संध्याकाळी एक चर्चा असे. या चर्चेचा संवादक (एन्कर) म्हणून अनेकदा मला जबाबदारी देण्यात येई. या चर्चेत निकालांविषयी राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार भाग घेत. अमुक उमेदवार का पडला, मतदानाची टक्केवारी, निवडणुकीतील मुद्दे अशा अनेक प्रकारच्या मुद्द्यांवर उहापोह होई. आता सरकार कसे घडेल त्यावरही तज्ञ आपली मते मांडत. स्व. जगदीश वाघ, स्व. गुरूदास (काका) सिंगबाळ, प्रकाश कामत वगैरे पत्रकार या चर्चेत भाग घेत असत. आकाशवाणी हे सरकारी माध्यम असल्याने चर्चेचा ओघ व दिशा सांभाळणे ही जबाबदारी असोशीने पार पाडावी लागत असे, पण त्यात सृजनशील आनंद असायचा. कमी वेळात अचूकतेने वेगाशी जुळवून घेऊन स्पष्ट उच्चारांसहीत बुलेटीनं वाचणं हे कौशल्य म्हणजे युध्द पातळीवरचं काम असतं. त्या पूर्तीचा आनंद मात्र पोटात मावेनासा होतो!


मुकेश थळी

(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक,कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)