घुसमट

अधूनमधून येणारे आवाज रमाला बेचैन करत होते, म्हणून त्यादिवशी तिने आकाशची पुस्तके सैरभैर करून ठेवली आणि काय चमत्कार! दुसऱ्या दिवशी पहाटे उठून पाहिली तर सगळी पुस्तके जशीच्या तशी नीटनेटकी मांडून ठेवली होती.

Story: कथा |
18 hours ago
घुसमट

रोजच्याप्रमाणे घरातील मुलांनी मिणमिणत्या चिमणीसमोर अभ्यास करून, पुस्तकं जागेवर ठेवून आपपल्या अंथरुणात घुस्पट मारली आणि निद्रेच्या कुशीतून स्वप्नजगात उडी मारली. मध्यरात्री कसल्याशा आवाजाने रमाला जाग आली. ती हळूच कानोसा घेऊ लागली. हळूच तिने जवळच झोपलेल्या आईकडे बघितले. त्या काळोख्या अंधारात तिच्या आईचा गोरापान चेहरा एखाद्या गुलाबासारखा खुलून दिसत होता. थकून भागून आलेली आई अगदी निर्धास्त झोपली होती हे बघून रमा आनंदली. पण तितक्यात तिला ‘ठाप ठाप’ असा आवाज ऐकू आला. आवाज तर शेजारच्या खोलीतून येतोय हे तिच्या कानांनी पक्कं केलं.

“कोण असेल? चोर आले असतील का?” तिच्या मनाला तिचा प्रश्न. “छे छे! चोर कसा येईल? बाहेर तर कितीजण झोपले आहेत. चोराची हिम्मतच होणार नाही घरात यायची. मग कोण असेल जे असं पुस्तकं वर-खाली करत असेल? उठवू का सगळ्यांना? नकोच! मागे एकदा असंच काकी स्वप्नात चोर चोर ओरडली आणि मी सगळ्यांना उठवलं. मग माझ्यावर सगळेच ओरडले होते, त्यापेक्षा नकोच!” म्हणत ती अजून आईच्या कुशीत शिरली.

सकाळी उठल्यावर तिला आकाश अभ्यास करताना दिसला. “काय रे, रात्री उशीरापर्यंत अभ्यास करत होतास की काय?” त्यावर मान वर करत आकाश म्हणाला, “छे! नाही गं, माझा अभ्यास फक्त दहा वाजेपर्यंत. पुढे जागरण तोलवत नाही मला.” तिरकी नजर त्याच्या पुस्तकांवरून फिरवून तिथून ती गेली.

साधारण तीन महिने झाले असतील आकाशच्या आईला जाऊन. खूप हुशार होती ती. सावळ्या रंगाची, काळ्याकुट्ट केसांची. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिच्या ओठांवर खिळलेलं. फराळ करण्यात तिचा हात धरणं केवळ अशक्य. तिचं विणकाम, भरतकाम, नुसत्या हाताने कपडे शिवताना अनेकवेळा रमा तिला बघत बसायची. रांगोळी तर बघत बसावी अशी काढायची. तिचा मेंदू होता की मशीन, कळायला मार्ग नव्हता. तिला काही प्रमाणात वनौषधीही माहीत होती. 

आकाशच्या आईला सगळंच छान जमतं पण तिचं फारसं घरात पटत नसायचं. ती उगाचच भांडत राहायची. याचं नेमकं कारण कधीच कळत नसायचं. एकदा बोलताबोलता आकाशची आई म्हणाली, “मी शाळेत नेहमीच पहिला नंबर घ्यायची. डॉक्टर व्हायचं होतं मला...” तिच्या खोल गेलेल्या डोळ्यातले पाण्याचे डोह कडा ओलावून गेले होते. ती शून्यात बघत, “शेवटी नशीब हेच वास्तव, बाकीची सगळी स्वप्ने.” म्हणत पटकन उठून आपल्या कामाला गेली. एकदा आजी म्हणाली होती, “माझ्या साध्या भोळ्या पोराला साधीशी बायको हवी होती. ही शिकलेली बायको अडाण्याला कशी कळेल?” काहीतरी कारण असेल म्हणून ती आमच्या काकांशी लग्न करून या घरात आली असेल, या विचाराने रमा पूर्ण झपाटलेली होती.

रमा आकाशबरोबर त्याच्या मामाकडे गेली होती. तिथे तिला समजले की आकाशच्या आईला ती पंधरा वर्षांची असताना एका भयंकर आजाराने ग्रासलं होतं. त्यावेळी तिच्यावर केलेल्या शस्त्रक्रियेचे डाग अजूनही तिच्या शरीरावर असल्यामुळे तिच्याशी कोणीच लग्न करायला तयार नव्हतं, म्हणून तिचं लग्न रमाच्या अशिक्षित काकांशी झालं होतं. खरंच या एका कारणामुळे तिची हिमालयाएवढी स्वप्नं मातीमोल झाली. त्यामुळे तिचं रागराग करणं साहजिक असलं तरी तिची इमेज मात्र खराब होत होती.

सुशिक्षित असून अशिक्षित माणसाबरोबर संसार करताना तिला होणाऱ्या वेदना, तिची होणारी तीव्र घुसमट ती कोणालाच दाखवू शकत नव्हती पण तिचा आकाशवर मात्र खूप जीव होता. त्याने शिकून मोठं व्हावं हे एकमेव स्वप्न आता तिच्या डोळ्यात दिसायचं. आकाशच्या हुशारीने अगदी ती हरखून जायची, त्याला मिळणारा पहिला नंबर जणू तिलाच मिळाला आहे, अशा तोऱ्यात ती आकाशचा अभ्यास घेताना बोलायची. तसं तिला प्रफुल्लित बघितलं की खूप आनंद व्हायचा रमाला. थोडं तरी सुख येतंय तिच्या वाट्याला असं वाटायचं तिला.

तिच्या शरीरात काहीतरी बिघडलं होतं. हल्ली ती अगदीच बारीक होत चालली होती. तोंडावर कोणी काही बोलत नव्हतं, पण पाठीमागून लोक तिच्या तब्येतीबद्दल बोलायचे. जुन्याजाणत्यांनी तिला डॉक्टरकडे जायचा सल्ला दिला. नंतर सोमवार पकडून ती डॉक्टरकडे गेली आणि जातच राहिली. पण शेवटी त्या जीवघेण्या आजाराने डोकं वर काढलं आणि तो महारोग विजयी झाला. तो दिवस तसाच्या तसा रमाच्या डोळयांपुढे उभा राहिला.

सकाळची वेळ होती. सगळ्यांना शाळेत जायची घाई, तर वडिलधाऱ्यांना शेतात जायची घाई. एवढ्यात तिच्या खोलीतून जोरजोरात आवाज येवू लागला. सगळेच त्या खोलीकडे धावले. ती शेवटची घटका मोजत होती. कुठूनतरी रमा धावत आली. तिच्या पायापाशी उभी राहिली. तिचे डोळे रमाला काहीतरी सांगत तसेच उघडे राहिले आणि ती या आपल्या भरल्या संसाराला सोडून गेली. अश्रूंचा महापूर घरात लोटला. नातेवाईकांचं रडणं संपूर्ण घरभर गुंजत होतं. ती कितीही भांडली तरी घराला तरतरी द्यायची. मुलांना योग्य मार्गदर्शन करायची. त्यामुळे तिने असं अवचित जाणं कुणालाच मानवणारं नव्हतं, पण नियती पुढे कुणाचंच चालत नसतं हेच खरं.

अधूनमधून येणारे आवाज रमाला बेचैन करत होते, म्हणून त्यादिवशी तिने आकाशची पुस्तके सैरभैर करून ठेवली आणि काय चमत्कार! दुसऱ्या दिवशी पहाटे उठून पाहिली तर सगळी पुस्तके जशीच्या तशी नीटनेटकी मांडून ठेवली होती. जसं सिनेमांत दाखवतात, तसंच आकाशची आई आपल्या मुलाची पुस्तकं नीट करायला रोज येत असावी, असं रमाच्या मनात येऊन तिला अनामिक भीती वाटली. पण ही गोष्ट तिने कोणालाच सांगितली नाही. नंतर श्राद्ध झाल्यानंतर मात्र असे आवाज कमी होत गेले हे ही तेवढंच खरं.


बबिता गावस