घरणीबाई जात्यावरच्या ओव्या गाताना काही काळासाठी का होईना, मनाने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीस जात असे. तिथे आपल्या पांडुरंगाचे लोभस, लेकुरवाळे रुपडे ती पाहत असे.
आपण दिन दुबळी असूनही दयाळू पांडुरंग आपल्यावर माया करतो, आपली काळजी वाहतो याचा घरणीबाईला आनंद होत असे. मनाने पंढरपूरची वारी करणारी ती पांडुरंग-रुक्मिणीचे संसार भक्तिभावाने पाहत असे. आपला संसारही असाच सुखाचा जावा अशी म्हणून म्हणते प्रार्थना करीत असते.
पांडुरंगाची ओढ लागलेली घरणीबाई स्वतःला संत जनाबाईच्या ठायी पाहत असे. संत जनाबाई पांडुरंगाच्या नात्यातली, ना गोत्यातली. पण तिच्यावर असलेल्या पांडुरंगाचे प्रेम पाहून ती गदगद होऊन तिच्या मुखातून ओवी निघे...
पंढरपुराच्या दरवाजात
रुक्मिणी हाक मारी
विठ्ठल देव माजो
जनी संगे दळण दळी
आपल्या भव्य मंदिरातून विठ्ठल अचानक नाहीसा होतो. हे पाहून रुक्मिणी विठ्ठलाच शोधायला जाते. अपेक्षित सर्व ठिकाणी विठ्ठलाचा शोध घेऊनही तो सापडत नाही म्हणून पंढरपूरच्या मंदिराच्या दरवाजात राहून ती विठ्ठलाला हाका हाका मारते. पण विठ्ठल सापडणार कसा? तो कुठे मंदिराचे परिसरात होता? तो तर कधीच गेला होता आपल्या सखीकडे, जनाबाईकडे. आणि त्यावेळी जनाबाई आपलं कष्टाचं दैनंदिन काम करताना, दळण करताना ओवी गात असे...
पीठ मी भरीयेले गे
बाई ठेविले मी सासू पुढे
विठ्ठल नी गे देव माजो
एवढे पंढरीत
असं जनीचो नाही कोण
वर म्हटल्याप्रमाणे घरणी बाई स्वतःला जनाबाईच्या जागी पाहत असे. जनाबाईच्या आयुष्याचा अभ्यास केला तर ती अविवाहित होती असे अभ्यासक सांगतात. पण अक्षर ओळखही नसलेल्या घरणीबाईला जनाबाई कोण, तिचे पूर्व आयुष्य, तिचे साहित्यिक योगदान याबद्दल काहीही देणे घेणे नसायचे. तिच्या लेखी जनाबाई म्हणजे विठ्ठलाची परमप्रिय सखी आणि आपणही जनाबाईसम विठ्ठलाशी एक रूप होणे हेच तिचे स्वप्न. जसा आपला संसार तसा जनाबाईचा संसार, जशी आपली दु:खे तशी जनाबाईची दु:खे असा विचार करूनच घरणीबाई ओवी म्हणायची की आपल्या सासरी जसा माझा वाली कोणीही नाही त्याप्रमाणे पंढरपुरामध्ये जनाबाईचा वाली कोणीही नव्हता. आणि म्हणूनच देव पांडुरंग जनाबाईसाठी धावून यायचा. अशी कल्पना करून घरणीबाई म्हणत असे...
हातात करंडा फणी
असं विठ्ठल घाली वेणी
रुक्मिणी विचार करी
जनी ती तुमची कोणी
काय सांगू की रुक्मिणी
जनी जीवाची मैतरीण
विठ्ठल बघावे तेव्हा जनाबाईच्या मदतीला जातो. तिच्या हातातलं मुसळ स्वत: घेऊन कांडतो. दळताना जात्याला हात लावतो. हाताला फोड आणि अंगाला शिण येईस्तोवर तिची मदत करतो. विठ्ठलाचे असे वागणे पाहून रुक्मिणीला जनाबाईचा मत्सर वाटतो आणि ती रागाने विचारते की, ही जी तुम्ही अशी जनीची सेवा करता, ती जनी तुमची आहे तरी कोण? आणि उत्तरा दाखल विठ्ठल सांगतो की, जनी माझी जीवाची मैत्रीण आहे. या मैत्रीच्या नात्याने मी तिला नेहमी मदत करणार. ही ओवी म्हणताना घरणीबाई मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात देव माझ्या संसारातही माझा सखा बनवून यावा. त्याने माझे दुःख दूर करावी अशी आस जणू बाळगत असते.
असाच अजून एक रुक्मिणी-विठ्ठल आणि जनाबाईचा प्रसंग चितारतना घरणीबाई म्हणते,
पंढरपुरामध्ये बाई
माळयेर नी गे माळी
रुक्मीण शिवी चोळी
चोळी शिवान केली काही
चोळी दिली ती जनाईला
रुक्मिणी विचार करी
जनी तू माझी आहे कोणी
वेडे खुळे गे रुक्मिणी
आम्ही बालपणाच्या मैतरीणी
पंढरपुरामध्ये रुक्मिणी आपल्या अनेक मजले (माळे) असलेल्या गडगंज राजवाड्यात स्वत:साठी चोळी शिवीत बसली होती. स्वत:साठी रेशमी कापडाची सुंदर चोळी शिवून रुक्मिणीने घालण्यासाठी म्हणून ठेवली होती. पण ती चोळी तिला आता काही सापडेना. रुक्मिणीला संशय आला आणि म्हणून तिने विठुरायाला विचारले, “मी शिवलेली चोळी कुठे गेली? तुम्ही कोणाला दिली आहे की काय?” अशावेळी रुक्मिणीला अपेक्षित उत्तर देताना पांडुरंग सांगतो की, “ती चोळी मी जनाईला दिली.” हे ऐकून रुक्मिणीला खूप राग येतो. माझ्या सुखाच्या संसारात पुन्हा पुन्हा डोकावणारी ही जनी माझी नक्की आहे तरी कोण? तिचे आणि माझे काय नाते असावे? त्या रागातच रुक्मिणी जनीला विचारते, “जनी तुझे आणि माझे नक्की काय नाते आहे? माझी सवत आहे की वैरीण?” या रुक्मिणीच्या प्रश्नाने निर्मळ मनाच्या जनीला कुठलाही मनस्ताप होत नाही. उलट ती रुक्मिणीला समजावत सांगते की, “वेडे खुळे रुक्मिणी, तू मला तुझी सवतही समजू नकोस आणि तुझी वैरीण सुद्धा समजू नकोस. तुझी सवत व्हावे एवढे माझे सौभाग्य नाही, तुला वैरीण वाटावे असे माझे दुष्कर्म नाही. आपण दोघी बालपणाच्या मैत्रिणी आहोत. ज्यांचा एकमेव मित्र विठ्ठल आहे. तो आमच्या जगण्याचा आधार आहे.” स्त्री सुलभ विचार घेऊन ओवीरूपाने मांडलेला हा प्रसंग, ही ओवी वाचताना जशास तसा आपल्यासमोर उभा राहतो. विठ्ठलाशी एकरूप झालेल्या रुक्मिणी आणि जनाबाई आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसू लागतात.
जनाबाईने रुक्मिणीला समजावून सांगितले तरीसुद्धा रुक्मिणीचा राग काही जात नाही. रुक्मिणी रुसते. कुठेतरी जाऊन कोपऱ्यात बसते. ही वार्ता पांडुरंगाला समजतात मात्र पांडुरंग रुक्मिणीच्या शोधात निघतो. अशी कल्पना करून घरणी बाई म्हणते,
रुसली रुकमीण
अशी बसली खाम्या आड
दयाळू पांडुरंग
सर्व शोधीता पंढरपूर
अशा विठ्ठल रुक्मिणीच्या संसारातील गमती जमतीची जुळवाजुळव आपल्या संसाराची करत घरणीबाई एक एक ओळी रचत असते, गात असते. गाता गाता पायली पायली तांदूळ, नाचणी ती दळत असते. हे कष्टाचे काम करताना सुद्धा विठ्ठलाशी एकरूप झाल्यामुळे तिला आपल्या कष्टांचे भान उरत नाही. आता तर प्रत्यक्ष देव पंढरीसकट तिच्या समोर उभा राहिला आहे असाच भास होत ती म्हणते,
भरली चंद्रभागा गे
पाणी लागला पायरीशी
पंढरी जाता मीया
पाणी घाली मी कळशीन
आईने बाप्पाविण
नाही विठ्ठलाचीनी भेट
आई-बापाच्या पुण्याईने या घरात आपले लग्न झाले. या घरात मी आता संसार करू लागले. हा संसार करताना ओवी रुपाने विठ्ठलाची भक्ती करू लागले. म्हणूनच आपल्याला विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन असे होत आहे असा विचार ती करते. दुपारच्या जेवणानंतर दळायला बसलेल्या घरणीबाईला जाणवते की आता संध्याकाळ होत आली आहे. दिवे लागण्याची वेळ झाली आहे. अशावेळी आपले दळण आवरताना ती गाते,
पंढरपुरामधी
तेल तिळाचं घनो भरी
कानडी रुक्मिणबाई
पाच समयी दियो लाई
तिन्हीसांज होता होता घरणीबाई आपल्या समाधीस्थ दळण्याच्या कामातून रजा घेते. तिचे दळण संपलेले असते. सुपात शेवटची मूठ धान्य शिल्लक असते. ती मूठ मारताना ती म्हणते,
सरला माझा दळाप
हात मारी मी सुपलीत
पिरतीच्या पांडुरंगा
सरती आरत कापुराची गे.
आणि ती देव्हाऱ्यात दिवा-वात करायला जाते. देवाला हात जोडल्यावर आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या नात्यागोत्यातील स्त्रियांना, यात कोणतरी तिची जाऊ असेल, तिची नणंद असेल, तिची बहीण असेल या सर्वांना ती आवर्जून सांगते,
सावळी परातली
देवाच्या देऊळात
पाच खेणीर पाच नाग
भयनी बाई माजे
हात जोडून पुत्र माग
असे सांगणे देवाला घातल्यावर, भक्तीपूर्ण हट्टाने आणि हक्काने देवाला म्हणते,
देवाच्या देऊळात
अशी केदोळ (किती वेळ)मीया उभी
कौल देना बेगी
आम्ही जातूय आमच्या घरी
फक्त स्वत:पुरते मागणे मागायचे असा स्वार्थी विचार तिने कधी केलेलाच नसतो. आपले मानायचे ते सासरच्या सर्वांनाच. चांगले करायचे ते सर्वांसाठी. देवासमोर मागणे मागायचे तेही सर्वांसमवेत.
संसारातील दुःखे कशी सोसावीत. जे आहे त्यात आनंद कसा मानावा हे तिने ओवीरूपाने समस्त मानवजातीला शिकवले आहे. कितीतरी संस्कार या ओवीतूनच उलगडत असतात. आपल्या नादमधुर ओव्यांमधून ‘इतरांसाठी जगला तो जगला’ असा भव्य दृष्टिकोन देणारी ती घरणीबाई, समृद्ध ओव्यांची रचिती मात्र उपेक्षितच राहिली.
गौतमी चोर्लेकर गावस