साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक प्रकरणांनी गाजला आठवडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या घोटाळ्यांनीही हा आठवडा गाजला. या प्रकरणांत राजकारण्यांचा सहभाग नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर अजून खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांनी कोणालाही क्लीन चिट दिली नसून यातून कोणीही सुटणार नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर नोकरी भरती आयोगही सक्रिय झाला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५५व्या आवृत्तीलाही या आठवड्यात सुरुवात झाली. जुन्या गोव्याच्या सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवशेष दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

रविवार 

नोकरी दिल्याचा पुरावा नाही : पोलीस

सरकारी नोकऱ्या देण्याचे आमीष दाखवून फसवण्याच्या प्रकरणांत आतापर्यंत २९ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून ३३ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी नोकरीसाठी पैसे दिल्याचा कोणताही पुरावा नाही. संशयितांनी चौकशीदरम्यान कोणत्याही मंत्री, आमदार किंवा राजकारण्यांचे नाव घेतले नाही. त्यांनी मंत्र्यासोबत फोटो काढला हा पुरावा नाही. या संदर्भात एसआयटी नेमण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही, असे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले.

गोव्याच्या करात एक हजार कोटींची वाढ

२०१४-१५ या आर्थिक वर्षात राज्यातून २८२० कोटी आयकर जमा झाला. २०२३-२४ मध्ये ती वाढून ३८६७ कोटी झाले. गेल्या १० वर्षात राज्याने गोळा केलेला हा सर्वाधिक आयकर आहे. केंद्रीय वित्त खाते तसेच आयकर विभागाने जारी केलेल्या विविध अहवालांमधून ही आकडेवारी समोर आली आहे.

सोमवार

कर्मचारी भरती आयोग सक्रिय

राज्य सरकारने स्थापन केलेल्या गोवा कर्मचारी भरती आयोगाने (जीएसएससी) आतापर्यंत सरकारी खात्यांमधील ६९ रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच ११ संगणक आधारित चाचण्या (सीबीटी) घेतल्या आहेत. त्यापैकी काहींना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. आयोग भविष्यात १९२५ रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.


कुत्र्यांची मोजणी

राज्यातील भटक्या व पाळीव कुत्र्यांची गणना २० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. पुढील दोन महिने हे काम सुरू राहणार असल्याची माहिती पशुपालन व पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. या कार्यक्रमातून राज्यातील पाळीव हिंस्र कुत्र्यांची संख्या उघड होईल, अशी माहिती खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक यांनी दिली.

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू

सावर्डे सत्तरीतील नदीत अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या सुवर्णा महादेव गावकर हिचा बुडून मृत्यू झाला. बोरी येथील श्री साईबाबा मंदिराच्या सभागृहात फुगडी घालताना गोकुळ कृष्णनाथ खेडेकर (५७, सावईवेरे) यांचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीत तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले.

मंगळवार

गोव्यात लखपती दीदी’, ‘लाडकी बहीण’चा विचार

भाजपशासित राज्यांमध्ये ‘लखपती दीदी’ आणि ‘लाडकी बहीण’ योजनांचा विचार व्हावा, असे मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने भविष्यात गोव्यातील भगिनींसाठी यूपीआय वॉलेट्स किंवा ई-व्हाऊचर किंवा ठराविक रक्कम देण्याचा निर्णय घेतला. महिला बचतगटांना बळकट करण्याच्या प्रस्तावांवरही सरकार चर्चा करेल.

कोणालाही क्लीन चीट नाही

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. ते क्लीन चिट या शब्दाचाही उल्लेख करत नाहीत. याप्रकरणी कोणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

बेकायदा घरांवर कारवाई

खडपावाडो कुचेली येथील कोमुनिनादच्या १.४४ लाख चौ. मी. जागेत बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरांच्या मालकांना उत्तर गोव्याचे कोमुनिनाद प्रशासक पांडुरंग गाड यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. सुमारे १.५ लाख चौरस मीटर क्षेत्रात दीड ते दोनशे घरे बांधण्यात आली आहेत.

बुधवार

सुलेमानशी संबंधित बँक खाते गोठवले!

खून, तसेच जमीन हडप प्रकरणात अनेक गुन्हे नोंद असलेला आणि सध्या शिक्षा भोगत असलेला सिद्दिकी उर्फ सुलेमान खान (५४, रा. म्हापसा) वापरत असलेले एका महिलेचे बँक खाते एसआयटीने गोठवले आहे. या खात्यात १.३६ कोटी रुपये होते. सिद्दिकीवर देशभरात एकूण १५ वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. त्याने ३५ महिलांची मदत घेतली असून चौकशीअंती सर्व संशयितांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.


जनतेने सतर्क रहावे : मुख्यमंत्री

राज्यात परदेशी नागरिकांची संख्या वाढत असल्याने गोव्यातील गुन्हेगारी वाढत आहे. सध्या सोने आणि मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत, ज्यात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लूट केली जात आहे. त्याविरोधात गोव्यातील जनतेने सतर्क रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गुरुवार


आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आणि गोवा यांच्यात वेगळेच नाते निर्माण झाले आहे. इफ्फी म्हटले की गोवा आणि गोवा म्हटले की इफ्फीची आठवण येते. इफ्फीने गोव्यासाठी खूप काही दिले. इफ्फीमुळे गोव्याला जागतिक स्तरावर मान-सन्मान मिळाला आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. दोना पावला येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर बुधवारी सायंकाळी रंगलेल्या ५५ व्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

शुक्रवार

आणखी एक जाहिरात

राज्य कर्मचारी भरती आयोगाने विविध खात्यांमध्ये एलडीसी, रिकव्हरी क्लर्क आनी ज्युनियर स्टेनोग्राफर मिळून २८५ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्यात नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक प्रकरणे उजेडात येत असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १३ डिसेंबर २०२४ आहे.


सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष दर्शन सोहळ्याला प्रारंभ

दर दहा वर्षांनी होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेष दर्शन सोहळ्याला हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पार्थिव ५ जानेवारीपर्यंत जुन्या गोव्यातील चर्चमध्ये ठेवण्यात येणार आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो आणि इतरांनी गोयच्या सायबाचे दर्शन घेतले.

शनिवार


पाटकरांसह २२ जणांना आंदोलन छेडण्यास बंदी!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह शनिवारच्या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या २२ पदाधिकार्‍यांना पुढील ६ महिने पणजी परिसरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उपजिल्हाधिकार्‍यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.

पणजीतील बाल गणेश मंदिराचे लवकरच स्थलांतर

बालभवन नजीकचे दयानंद बांदोडकर मार्गावरील कांपाल येथील श्री बाल गणेश मंदिराचे लवकरच स्थलांतर होणार आहे. शेजारील कांपाल परेड मैदानावर या मंदिराचे स्थलांतर करण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी १२ वा. या मंदिरासाठीचे भूमिपूजन पार पडले.


हेही वाचा