महाराष्ट्रात महायुती सरकारचा उद्या शपथविधी शक्य

मुख्यमंत्री भाजपचाच : वानखेडे स्टेडिअमवर होणार शपथविधी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
महाराष्ट्रात महायुती सरकारचा उद्या शपथविधी शक्य

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभुतपूर्व यश मिळवले आहे. या सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. २६ नोव्हेंबरच्या आधी महाराष्ट्रात सरकार स्थापन होणे आवश्यक असल्याने त्याआधीच महायुती सरकार स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण ? याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले असून मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार, असेही सांगण्यात येत आहे.
राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघापैकी २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात सोमवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर महायुती सरकारचा शपथविधी पार पडला जाणार आहे. राज्यात सर्वात जास्त भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. तर महायुतीमधील मागचा पॅटर्न देखील याही वेळेस पहायला मिळणार आहे. राज्यातील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याचे समजत आहे. महायुतीच्या या नव्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये कुणाला किती जागा मिळणार ? यात कुणाला मंत्रीपदाची लॉटरी लागणार ? ते पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात महाराष्ट्रातील निवडणूक विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्लीत संबोधित केले.गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला किंवा निवडणूकपूर्व आघाडीला मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे. सलग तिसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वात आघाडीला बहुमत मिळाले आहे. सलग तिसऱ्यांदा भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला सलग तिसऱ्यांदा बहुमत देणारे महाराष्ट्र हे देशातले सहावे राज्य ठरले आहे, असे मोदी म्हणाले. याआधी गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा मध्य प्रदेशने भाजपला सलग तीनवेळा बहुमत दिले आहे.

महायुतीच्या एकजुटीचा विजय : फडणवीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा विजय राष्ट्रीय विचारांच्या संघटनांचा विजय आहे.  महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदासजी आठवले, आमचे सगळे मित्रपक्ष या सर्वांचा हा विजय आहे. या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. 'जनतेने ज्याप्रकारे विजय मिळवून दिला आहे, हा खऱ्या अर्थाने विजय आमची जबाबदारी वाढवणारा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर महाराष्ट्राने दाखवलेला हा विश्वास आहे.

सुशासनाचा विजय : मोदी

महाराष्ट्रात विकासवादाचा, सुशासनाचा, खऱ्याखुऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला असून विभाजनवादी शक्ती आणि खोटेपणाचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात एकट्या भाजपला महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयातील विजयी सभेत काढले.


पराभूत झालेले दिग्गज नेते
बाळासाहेब थोरात (काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष), नवाब मलिक (राष्ट्रवादी अजित पवार गट), पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते), इम्तियाज जलील (एआयएमआयएमचे नेते), हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट), राजेश टोपे (राष्ट्रवादी शरद पवार गट), माणिकराव ठाकरे (माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस), भावना गवळी (शिवसेना शिंदे गट), यशोमती ठाकूर (काँग्रेसच्या नेत्या)
सदा सरवणकर (शिवसेना शिंदे गटाचे नेते) व बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते)