काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव पुन्हा सिद्ध : दिगंबर कामत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव पुन्हा सिद्ध : दिगंबर कामत

मडगाव : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील भाजपचे निर्भेळ यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची पोचपावती आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसला १०० जागा मिळतील असे सांगण्यात येत होते त्यांना २० जागा मिळाल्या आहेत. यावरून काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे मत आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अटीतटीची लढाई असे चित्र उभे करण्यात आले होते. मात्र, आता निकालातून त्याचे वास्तव दिसून आलेले आहे. खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी व खरी राष्ट्रवादी कोणती हे अजित पवार यांनी दाखवून दिले आहे. काँग्रेस या निवडणुकीत १०० जागा जिंकणार असे सांगण्यात येत होते, पण काँग्रेस १०० वरून ८० ते ९० नाही तर २० वर पोहोचलेली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रात नेतृत्व काय, याची झलक या निकालातून दिसून येते.
लोकसभेत ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या. ते त्याच निकालावरून गणिते मांडत राहिले व १६० व १७० जागा मिळतील, असे अंदाज लावत राहिले होते. भाजपने पहिल्यांदा महाराष्ट्रात इतिहास घडवलेला आहे. महाआघाडी ५० जागांवरही पोहोचू शकलेले नाही. मुंबईसारख्या शहरात भाजपचे १५ पेक्षा जास्त जागांवर लीड आहे, असेही आमदार दिगंबर कामत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे हे यश आहे. सर्वसामान्यांचा विचार करून येथे ‌‌विविध योजना आखण्यात येत आहेत. तळागाळातील लोकांना याचा फायदा होत असल्याने लोक भाजपसोबत राहत आहेत. महाराष्ट्रातील निकालातून काँग्रेसकडे नेतृत्व नसल्याचे दिसून आलेले आहे. _दिगंबर कामत, आमदार