निर्वासितांच्या जगण्यातील महिला व मुलांचा जीवनासाठीचा संघर्ष, मानवी नात्यातील चढउतार या चित्रपटातून दर्शवण्यात आलाय.
मडगाव : जागतिक तापमानात बदल होत असून अनेकवेळा हवामान बदलाच्या चर्चा चांगल्याच रंगतात. पण चर्चेनंतर आपणास काय फरक पडणार अशी गाठ मनाशी बांधत पुन्हा त्या गोष्टींचा विसर पडतो. यातून जनमानसाला भानावर आणत हवामान बदलासारख्या विषयाकडे किती गांभीर्याने पाहिले जावे यावर लक्ष वेधणारा चित्रपट म्हणजे ब्लॅक बटरफ्लाय.
स्पॅनिश दिग्दर्शक डेव्हिड बौटे यांनी अॅनिमेशनच्या वापरातून जागतिक स्तरावर परिणामकारक विषयावर भाष्य केलेले आहे. त्यांनी दहा वर्षांपासून अभ्यासपूर्ण माहिती गोळा केली आहे. भारत, कॅरिबेयन व तुर्काना भागातील घटनांच्या अभ्यासाअंती तनित, व्हॅलेरिया आणि शैला या जगाच्या वेगवेगळ्या भागांतील तीन स्त्रिया चित्रपटात दर्शवण्यात आलेल्या आहेत.
ज्यांना हवामान बदलामुळे घडलेल्या समस्यांना सामोरे जावे लागले. शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब, किनारपट्टी भागातील पर्यटन व्यावसायिक व आदिवासी जमातीतील जीवन जगणार्या समाजाला आलेल्या अडचणीत निर्वासित होण्याची वेळ येणे.
निर्वासितांच्या जगण्यातील महिला व मुलांचा जीवनासाठीचा संघर्ष, मानवी नात्यातील चढउतार या चित्रपटातून दर्शवण्यात आलेला आहे.
अॅनिमेटेड चित्रपट असला तरीही कॅमेर्याच्या तंत्राचा विशेष उपयोग, वापरण्यात आलेले पार्श्वसंगीत या सर्वांचा मोठा परिणाम प्रेक्षकांवर होतो. तिन्ही स्त्रियांच्या संघर्षातून सतत जाणवणारा त्यांचा चेहरा, पारंपरिक कथांचा करण्यात आलेला वापर या सर्वांमुळे स्त्रियांच्या वेदना, भीती, अंर्तमनातील सतत होणारे आघात त्यांच्या भावना यांचा प्रवास स्पष्ट होत जातो.
हवामान बदलाची आपत्ती दूरवर घोंघावत असल्याचे चित्र असतानाच अचानपणे समोर ठाकणारे विनाशकारी चित्र व त्या परिस्थितीमुळे भविष्यात येणार्या अडचणी दर्शवण्यात दिग्दर्शकाला यश आलेले आहे.
ही वेळ सावरण्याची-
जागतिक हवामान बदलाचे व्यापक परिणाम हे अगदी घराजवळ आलेले असून ही वेळ सावरण्याची असल्याचे दर्शवणारा हा चित्रपट आवर्जून पाहण्यासारखा आहे. हवामान बदलासह निर्वासितांची जगभरातील स्थिती, जंगलांतून वास्तव करणार्या आदिवासी समाजावर दळणवळण व इतर सुविधांमुळे झालेला परिणाम अंतर्मुख करतो.